अहमदाबाद, 19 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर यावेळी प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेला भारतीय संघ 50 षटकांत 240 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे हा अंतिम जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला आता 241 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. आता भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
नामदेव जाधवांच्या तोंडाला काळे फासले; 10 ते 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
तत्पूर्वी आजच्या सामन्यात भारतीय संघाच्या डावाची सुरूवात खराब झाली. यावेळी भारताचा सलामीवीर शुभमन गिल संघाची 30 धावसंख्या असताना बाद झाला. त्याने केवळ 4 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने नेहमीप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. रोहित शर्माने 30 चेंडूत 47 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 3 षटकार लगावले. त्यानंतर श्रेयस अय्यर (4) देखील लवकर बाद झाला.
मग केएल राहुल आणि विराट कोहलीने भारताचा डाव काहीसा सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. त्यानंतर विराट कोहली 63 चेंडूत 54 धावा करून बाद झाला. त्यावेळी स्टेडियममध्ये शांतता पसरली होती. त्यानंतर रवींद्र जडेजा 22 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. या सामन्यात भारतातर्फे केएल राहुलने सर्वाधिक धावांचे योगदान देत 66 धावांची खेळी केली. राहुल बाद झाल्यानंतर भारताचे सूर्यकुमार यादव (18), मोहम्मद शमी (6), जसप्रीत बुमराह (1), कुलदीप यादव (10) हे फलंदाज लवकर बाद झाले. तर मोहम्मद सिराज हा 9 धावांवर नाबाद राहिला.
मोदी सरकार आल्यापासून क्रिकेटचा राजकीय कार्यक्रम झालाय – संजय राऊत
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना प्रत्येकी 2, तर ग्लेन मॅक्सवेल आणि ॲडम झॅम्पाने प्रत्येकी 1 विकेट घेतली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे भारताला 240 धावांवर रोखण्यात त्यांना यश आले. तर आता भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. यामध्ये मोहम्मद शमी जबरदस्त फॉर्मात आहे. शमीने या विश्वचषकात आतपर्यंत 7 सामन्यांत 23 विकेट घेतल्या आहेत. तर या स्पर्धेत तो सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील मोहम्मद शमीने भेदक गोलंदाजी करावी, अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट चाहते करीत आहेत.
One Comment on “भारताचे ऑस्ट्रेलिया समोर 241 धावांचे लक्ष्य”