मराठा आंदोलनाविरोधात सदावर्तेंची कोर्टात धाव

मुंबई, 02 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या विविध आंदोलने केली जात आहेत. तसेच मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे 25 ऑक्टोंबरपासून उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे. यासंदर्भात सदावर्तेंनी आता मराठा आरक्षण आंदोलनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी मराठा आंदोलकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तर त्यांच्या याचिकेवर 8 नोव्हेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या या याचिकेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी यापूर्वी देखील मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे. त्यांनी याच्या आधी मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका कोर्टात दाखल केली होती. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण संदर्भातील सरकारचा निर्णय रद्द केला होता. याचाच राग मनात धरून मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली होती. याप्रकरणात तिघांना पोलिसांनी अटक केली होती. तर सदावर्ते यांनी आता मराठा आरक्षण आंदोलनाच्या विरोधात याचिका दाखल केल्यामुळे त्यांच्या विरोधात मराठा समाज संतप्त होण्याची शक्यता आहे.

असले व्हीआयपी कल्चर आम्हाला मान्य नाही – श्रीकांत शिंदे

तत्पूर्वी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील हे गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यानंतर मराठा समाजाच्या वतीने राज्यात अनेक आंदोलने केली जात आहे. या आंदोलनांना काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. तसेच या आंदोलनाचा फटका राजकीय नेत्यांना देखील बसला आहे. यावेळी संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी अनेक नेत्यांच्या गाड्यांचे नुकसान केले. सोबतच त्यांनी नेत्यांच्या घराला आग लावली. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण मागे घ्यावे, यासाठी राज्य सरकारच्या वतीने अनेक प्रयत्न केले जात आहेत. सध्या राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करीत आहे. त्यामुळे त्यांच्या या चर्चेत मराठा आरक्षणावर काही तोडगा निघेल काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारचे शिष्टमंडळ आज घेणार जरांगे पाटलांची भेट

One Comment on “मराठा आंदोलनाविरोधात सदावर्तेंची कोर्टात धाव”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *