लखनौ, 29 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज (दि.29) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. हा सामना लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर दुपारी 2 वाजल्यापासून खेळविण्यात येईल. तत्पूर्वी, सलग 5 सामने जिंकून टीम इंडिया या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाने आपण जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे सिद्ध केले. इंग्लंडविरुद्धचा हा सामना जिंकल्यास भारतीय संघ उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल टाकणार आहे. तर दुसरीकडे इंग्लंड संघ सध्या त्यांच्या खराब फॉर्म मधून जात आहे.
या स्पर्धेत इंग्लंडला 5 सामन्यांत 4 वेळा पराभव पत्करावा लागला आहे. या निराशाजनक कामगिरीमुळे इंग्लंडचा संघ गुणतालिकेत सध्या शेवटच्या स्थानी आहे. जर आजच्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडिया विरुद्धचा सामना गमावला, तर इंग्लंडचे या विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात येणार आहे. त्यामुळे इंग्लंडला आता उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी चांगला खेळ दाखवावा लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर 5 धावांनी थरारक विजय
दरम्यान, एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि इंग्लंड यांच्यात 8 सामने झाले आहेत. त्यापैकी इंग्लंडने 4 सामन्यात विजय मिळवला, तर टीम इंडियाने 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच या दोन्ही संघांमध्ये झालेला एक सामना टाय झाला आहे. तसेच इंग्लंडसाठी एक खास गोष्ट म्हणजे, 2003 पासून भारताने इंग्लंडविरुद्धचा एकही विश्वचषक सामना जिंकलेला नाही. त्यामुळे गेल्या सामन्यात टीम इंडियाने न्युझीलंडला विश्वचषकात 20 वर्षानंतर हरवले, त्याचप्रमाणे टीम इंडिया आज इंग्लंडला 20 वर्षानंतर हरवणार का? याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा असणार आहेत.
एका कुटुंबातील 7 जणांची सामूहिक आत्महत्या
तत्पूर्वी, आजच्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या घोट्याच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे टीम इंडियासाठी ही चिंतेची बाब आहे. याआधीच्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या खेळला नव्हता. त्यामुळे त्याच्या जागी सूर्यकुमार यादव आणि शार्दुल ठाकूरच्या जागी मोहम्मद शमी यांचा टीम इंडियात समावेश करण्यात आला होता. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ काही बदल करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर आजच्या सामन्यातील लखनौची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांना मदत करणारी असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात आर.अश्विनची संघात वर्णी लागण्याची शक्यता आहे.
One Comment on “गतविजेत्या इंग्लंडशी आज टीम इंडियाचा सामना”