बारामती, 28 जानेवारी: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या दुर्दैवी घटनेवर स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी शरद पवार म्हणाले की, अजित पवार हे कर्तृत्ववान आणि निर्णयक्षमता असलेले नेतृत्व होते. हा अपघात केवळ दुर्दैवी घटना असून त्यामागे कोणतेही राजकारण नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगत, अशा संवेदनशील प्रसंगी राजकीय आरोप टाळावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
https://x.com/i/status/2016509240379318655

शरद पवार यांची प्रतिक्रिया
“अजित पवार ह्यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात.” असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

मी आज मिडियासमोर येणार नव्हतो पण काही माध्यमांमध्ये ह्या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली, असं कळलं. पण ह्यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे. ह्या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया ह्यात राजकारण आणू नये. एवढंच सांगायचं आहे, असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मुंबईहून बारामतीकडे येत असताना झालेल्या चार्टर्ड विमान अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांचे पार्थिव सध्या अंत्यदर्शनासाठी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात ठेवण्यात आले आहे. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने येथे दाखल झाले आहेत. मैदान परिसरात प्रचंड गर्दी जमली असून, सर्वत्र शोकाकुल वातावरण दिसून येत आहे. बारामतीत जणू लोकांचा महासागर उसळल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

