बारामती, 28 जानेवारी: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज (दि.28) विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव सध्या बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले असून, अंत्यदर्शनासाठी पवार कुटुंबीयांसह पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने येथे जमले आहेत.
https://x.com/i/status/2016437048631345354

कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
या पार्श्वभूमीवर, मेडिकल कॉलेजच्या परिसरात सकाळपासूनच भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे. हातात अजित पवारांचे छायाचित्र घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले असून, परिसरात शोकाकुल शांतता आणि आक्रोशाचे वातावरण आहे. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर चेहऱ्यावर अपार दुःख दिसून येत आहे.

https://x.com/i/status/2016440309593653664
सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे बारामतीत दाखल
दरम्यान, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या देखील दिल्लीहून बारामतीत पोहोचल्या आहेत. कुटुंबीयांच्या आगमनानंतर वातावरण अधिकच भावुक झाले. संपूर्ण पवार कुटुंबावर सध्या दुःखाचा डोंगर पसरला आहे.

मुंबईहून बारामतीकडे येताना झालेल्या चार्टर्ड विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, बारामतीत सर्वसामान्य नागरिकांपासून ते पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते अंत्यदर्शनासाठी दाखल होत आहेत. कायदासुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अजित पवार यांच्या अंत्यविधीबाबतची पुढील माहिती कुटुंबीयांकडून लवकरच जाहीर केली जाणार आहे.
महाराष्ट्राने एक अनुभवी, रोखठोक आणि जनतेशी थेट नाते असलेला नेता गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत असून, बारामती सध्या शोकसागरात बुडाल्याचे चित्र दिसत आहे.

