अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बारामतीकडे रवाना, तीन दिवसांचा दुखवटा

अजित पवार निधन

बारामती, 28 जानेवारी: बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या विमान दुर्घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राजकारणात आणि जनमानसात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

https://x.com/i/status/2016402599013187724

मुख्यमंत्र्यांकडून सर्व कार्यक्रम रद्द

या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम तात्काळ रद्द केले असून, ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात बारामतीकडे रवाना होत आहेत. परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आणि कुटुंबीयांना धीर देण्यासाठी दोन्ही नेते बारामतीला पोहोचणार आहेत.

शासकीय सुटी जाहीर

दरम्यान, राज्य सरकारकडून आज शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली असून, तीन दिवसांचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात कोणतेही शासकीय मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार नाहीत. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “दादा गेले! जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे.”

ते पुढे म्हणाले की, “मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य 4 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. माझे सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहेत. थोड्याच वेळात बारामतीसाठी निघतो आहे.” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *