असंतोष निष्ठावंत!

बारामती, 15 नोव्हेंबरः काल-परवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे पुणे जिल्हा अध्यक्षांनी पक्षाला ओपन चॅलेंज दिले, तुम्ही आमच्या मनासारखे केले नाही तर, आम्हाला कोले तर आम्हीही तुम्हाला कोलणार! हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदाच्या जबाबदार व्यक्तीने जाहीर केले.




बारामती तालुक्यात असे बोलण्याचे धाडस कोणीही दाखवले नाही, हे बारामतीकरांचे सुदैव! पण इंदापूर मध्ये लागलेला आगीचा धूर बारामती मध्ये स्पष्ट दिसत होता. जळया व वाफा इथपर्यंत पोहोचल्या नाहीत, आगडोंब तरीही उसळलेला आहे, अग्निशामक दलाचे अनेक वाहने सर्व शस्त्र अस्त्रे सहित दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचले असून परिसर थंडगार करण्याचा प्रयत्न चालू आहे.




राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे जिल्हा अध्यक्ष यांचा राजकीय प्रवास तसा काँग्रेस विरोधी आहे. पतीत पावन शिवसेना, भाजप यांच्याशी त्यांचे जवळकीचे, आपुलकीचे व विचारांचे लागेबांधे असल्यामुळे कदाचित त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात घुसपट होत असेल. ऐन युद्धाच्या वेळेस सेनापती बदलून दुसऱ्याला टोप शीला द्यायचा, हे कसले राजकारण?




इतके वर्षे निष्ठेने काम केल्यानंतर, 100% समर्पणाने काम केल्यानंतर समर्पित कार्यकर्त्याला डावलून चाटुगिरी करणाऱ्या चमच्यांना प्रतिष्ठेच्या पदावर सोन्याची खुर्ची द्यायची, हे हे राजकारण नसून आप मतलबीपणा आहे, असा घरचा आहेर इंदापूरकरांनी अप्रत्यक्ष दिला आहे.


बारामतीकरांची वैचारिक मूठ, जडण- घडण, वैचारिकता ही पाच सहा पिढ्यांपासून काँग्रेसमय आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फट पडल्यानंतर मानाचा महल सोडून काही काँग्रेस जणांनी कच्च्या झोपडीत संसार थाटला. तिथपासून आजपर्यंत या सगळ्यांचे कत्तरवड झाले आहे. यातच काही निष्ठावंत असंतुष्ट तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहे. इंदापुरात हा उठाव झाला, बारामतीत होईलच याचा नियम नाही. राजकीय दहशतीचा हा परिणाम असेल कदाचित, इथल्या निष्ठावंतांना अंतरमनाचा आवाज ऐकू येत नसेल किंवा सोन्या चांदीच्या ढिगार्‍याखाली तो दबला असेल. स्वत्व, मीत्व प्रकट होण्यासाठी अजून काही काळ लागेल. पण राष्ट्रवादी अप आणि शप यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.


“पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा, वैशेला मणींचा हार, साहेब- दादा अजेब तुझे सरकार!”बदफौल्यांना बरोबर घेऊन त्यांना सन्मानित करणे, उगीच पक्षाच्या मनाची व शरीराची सूज वाढवण्यापेक्षा निरोगी व शक्तीशाली पक्षाकडे वाटचाल करावी, हीच शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *