बारामतीतील 1000 शिक्षकांना नवतंत्रज्ञानाचे अत्याधुनिक प्रशिक्षण

बारामती, 29 सप्टेंबर: बारामती तालुक्यातील तब्बल 1000 शिक्षकांनी अत्याधुनिक नवतंत्रज्ञान आणि शिक्षण पद्धतींचे प्रशिक्षण घेतले. महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या वतीने बारामती येथील सायन्स सेंटर मध्ये 28 जून 2025 रोजी कृत्रिम बुद्धीमत्ता, रोबोटिक्स, व्हर्च्युअल रियालिटी अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या विविध लॅबचे उद्घाटन झाले. या लॅबमुळे पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अशा तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी एक संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. याच उपक्रमात 1000 शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे आयोगाने निश्चित केले होते.



महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी या उद्घाटन कार्यक्रमात शालेय शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे बारामती गटशिक्षणाधिकारी श्री. अनिल गवळी यांनी सर्व शाळांना आपापले शिक्षक सहभागी करण्याविषयी सूचित केले. यानुसार शालेय शिक्षकांना असे तंत्रज्ञान अंगीकारून अध्यापनात योग्य ते बदल घडवून आणण्यासाठी सदर प्रशिक्षण कार्यक्रम शारदानगर येथे 2 ऑगस्ट 2025 पासून सूुरू करण्यात आला. नुकताच या प्रशिक्षण कार्यक्रमाचा सांगता कार्यक्रम शारदानगर येथे पार पडला.या सांगता कार्यक्रमासाठी राजीव गांधी आयोगाचे श्री. नरेंद्र शहा, श्री. अनिल मानेकर, श्री. ए. व्ही. सप्रे, श्री. एच. व्ही. मालंडकर, श्री. दिनेश जगताप, श्री. पराग दुपारे उपस्थित होते.

बारामती येथील 1000 शिक्षकांच्या यशस्वी प्रशिक्षणानंतर पुढील टप्प्यात ह्या प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध 5000 शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार असून पुढील टप्पा लवकरच सुरु होणार असल्याचे राजीव गांधी आयोगाचे सचिव श्री. नरेंद्र शहा यांनी सांगितले.




या प्रशिक्षणात शिक्षकांनी कृत्रिम बुद्धीमत्ता, रोबोटिक्स, डिझाईन थिंकिंग, अत्याधुनिक विदेशी शिक्षणपद्धती, मेंदू आधारित शिक्षणपद्धती यांचे शास्त्रशुध्द पद्धतीने प्रशिक्षण घेतले. केवळ आधुनिक तंत्रज्ञान आणि शिक्षणपद्धती समजून घेणे एवढाच या प्रशिक्षणाचा उद्देश नसून अशा तंत्रज्ञानाचा वापर अभ्यासक्रम शिकवताना अभ्यासातील संकल्पना स्पष्ट करणे आणि त्या संकल्पनांचा नियमित अध्यापनात वापर करणे हा आहे.


प्रशिक्षणात सहभागी शिक्षकांनी प्रशिक्षणातील उपक्रम आणि अध्यापन पद्धती शाळेत वापरण्याचा मनोदय व्यक्त करताना सदर विद्यार्थ्यांना या पद्धतींचा फायदा होईल तसेच या अध्यापन पद्धतींमुळे आम्ही समृद्ध झाल्याची भावना व्यक्त केली. अशी माहिती सेंटरच्या व्यवस्थापक सौ. हीना भाटीया यांनी दिली.

या कार्यशाळेसाठी संस्थेचे चेअरमन श्री राजेंद्र पवार आणि विश्वस्त सौ. सुनंदा पवार यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक, सीबीएसई शाळेतील सर्व शिक्षकांनी आणि सायन्स सेंटरच्या स्टाफने सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *