संपुर्ण जिल्ह्यालाच लम्पी चर्म रोगासाठी नियंत्रण क्षेत्र घोषित

पुणे, 4 सप्टेंबरः गोवर्गीय जनावरांमध्ये लम्पी चर्म रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपुर्ण पुणे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या रोगासाठी नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या संदर्भातील आदेश पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे चे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. या आदेशानुसार गो वर्गीय प्रजातींमधील इतर सर्व प्राणी ( म्हैस वर्गीय वगळून) वर अनेक बंधने लादण्यात आलेली आहेत.

दरम्यान, पुण्यातील औंध येथील रोग अन्वेषण विभागातील पशुसंवर्धन सहआयुक्त यांच्याकडे पुणे जिल्ह्यातील शिरुर, दौंड, खेड, आंबेगाव, हवेली, पुरंदर आणि मुळशी तालुक्यातून गो वर्गीय जनावरांमधील पाठविलेले रोग नमुने हे लम्पी चर्म रोगासाठी पॉझिटीव्ह आले आहेत. या अहवालानुसार पुणे जिल्ह्यात लम्पी चर्म रोग या संसर्गजन्य रोगाचा गो वर्गीय जनावरांमध्ये प्रादुर्भाव झालेला आढळून आले आहे. या अहवालानुसार, संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार अनुसुचित रोगांचा प्रतिबंध, नियंत्रण व निर्मुलन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सर्व अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. या अधिकारानुसार पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांनी जिल्हा गो वर्गीय जनावरांमधील लम्पी रोग या रोगासाठीनियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करून पुढील आदेश काढले आहेत.

1) लम्पी चर्म रोगावर नियंत्रण, प्रतिबंधन व निर्मूलन करता येईल, तसेच गुरे आणि गो प्रजातीय प्रजातींमधील इतर सर्व प्राणी (म्हैस वर्गीय वगळून) यांना ज्या ठिकाणी ते पाळले जातात, त्या ठिकाणापासून उक्त नियंत्रण क्षेत्रातील किंवा क्षेत्राबाहेरील अन्य कोणात्याही ठिकाणी ने- आण व वाहतूक करताना किमान 28 दिवसांपूर्वी लम्पी चर्म रोगासाठी प्रतिबंधात्मक गोट पॉक्स लसीकरण केल्याचे लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील.

2) लम्पी चर्म रोगाचा प्रसार होवू नये म्हणून, कोणत्याही व्यक्तीस, उक्त बाधीत गो जातीय प्रजातीचे जीवंत अथवा मृत प्राणी, कोणत्याही उक्त बाधीत झालेल्या गो जातीय प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा कोणताही भाग किंवा अन्य प्राण्यापासूनचे अन्य कोणतेही उत्पादक उक्त नियंत्रण क्षेत्रामधून बाहेर नेण्यास मनाई करीत आहे.

राज्य स्तरीय शस्त्र व शास्त्र स्पर्धेत राजे प्रतिष्ठान प्रथम

3) कोणत्याही गो जातीय प्रजातीच्या प्राण्यांचे बाजार भरवणे व बाजारातील खरेदी-विक्री करतांना किमान 28 दिवसांपूर्वी लम्पी चर्म रोगासाठी प्रतिबंधात्मक गोट पॉक्स लसीकरण केल्याचे लसीकरण प्रमाणपत्र व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा आरोग्य दाखला बाजार समितीस सादर करणे बंधनकारक राहील.

4) गो वर्गीय प्राण्यांच्या शर्यती आयोजित करणे, जत्रा भरवणे, प्रदर्शन आयोजित करणे आदी. प्रसंगी सहभागी होणारी सर्व गो वर्गीय प्रजातीच्या जनावरांचे किमान 28 दिवसांपूर्वी लम्पी चर्म रोगासाठी प्रतिबंधात्मक गोट पॉक्स लसीकरण केल्याचे लसीकरण प्रमाणपत्र व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा आरोग्य दाखला आयोजकास सादर करणे बंधनकारक राहील.

5) प्रयोगशाळा निदानामध्ये जिल्ह्यातील ज्या भागातील पशुपालकांचे गो जातीय प्रवर्गातील जनावरांना लम्पी चर्म रोगाची लागण झाल्याचा निष्कर्ष होकार्थी (रिपोर्ट पॉझिटीव्ह) येतील अशा ठिकाणापासून 5 कि.मी. त्रिजेच्या परिघामधील सर्व संक्रमित न झालेले जनावरांचे रिंग व्हॅक्सीनेशन त्वरीत करून रोगाचा फैलाव इतरत्र होणार नाही, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे.

बारामतीच्या आशिषची एमपीएससी स्पर्धेत घवघवीत यश

6) लम्पी चर्म रोगाचा फैलाव इतरत्र होवू नये, यासाठी केंद्र शासनाच्या अ‍ॅडव्हायजरी नुसार बाह्य किटक नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये (नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात) राबविण्यात यावेत.

7) लम्पी चर्म रोगाविषयी पशुपालकांमध्ये जनजागृती व माहिती होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत व्यापक प्रसिद्धी देण्यात येवून रोगाचे नियंत्रण व निर्मुलन होण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयाने कामकाज करावे.

सदर आदेश निर्गमित झाल्यापासून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील. तसेच लम्पी चर्म रोग परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेऊन पुढील सुधारीत आदेश निर्गमित करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

One Comment on “संपुर्ण जिल्ह्यालाच लम्पी चर्म रोगासाठी नियंत्रण क्षेत्र घोषित”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *