बेकायदेशीर मोबाईल टॉवर विघटनास प्रशासन उदासीन

बारामती, 24 मेः बारामती शहरातील आमराई विभागातील सर्वोदय नगर येथे काही दिवसांपूर्वी मोबाईल टॉवर बसविण्यात आला. सदर टॉवर हा बेकायदेशीररित्या बसविल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. टॉवर उभारणीसाठी बारामती नगर परिषदेची रितसर परवानगी घेतली नसल्याचे बोलले जात आहे.

सदर टॉवर विरोधात चंद्रमणी नगर आणि सर्वोदय नगरमधील स्थानिकांनी एकत्र येत सह्यांची मोहीम राबवत बारामती नगर परिषद आणि महावितरणला तक्रारी अर्ज केला. या अर्जाची दखल घेत महावितरणने टॉवरचा विद्युत पुरवठा रद्द केला आहे. तसेच नगर पालिकेने सदर टॉवर उद्ध्वस्त करण्यासंबंधीचे आदेश दिले आहेत. मात्र एक महिना होऊनही पुढील कारवाई झालेली नाही.

या टॉवरमुळे आसपासचा परिसरात राहणाऱ्या अनुसूचित जातीच्या लोकांच्या आरोग्यावर भविष्यात विपरीत परिणाम होणार आहे. यामुळे या टॉवरविरोधात स्थानिकांकडून संतापाची लाट आहे. तसेच सदर टॉवर प्रकरणात तक्रारदारांनी बारामती- इंदापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांना तक्रार केली आहे.

सदर हलगर्जीपणे टॉवर उभारणाऱ्या आयडिया मोबाईल कंपनीचे सुपरवायझर, टॉवर उभा करण्यासाठी जागा देणाऱ्या संबंधित व्यक्ती आणि आदेश मिळूनही कारवाईस दिरंगई करणाऱ्या बारामती नगर परिषदेच्या संबंधित कर्मचाऱ्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा, तसेच तात्काळ बेकायदेशीर टॉवर उद्ध्वस्त करावा या मागणीसाठी 1 जून 2022 पासून तक्रारदार धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हलगर्जी करणाऱ्या कंपनीवर व बारामती नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *