बारामती-फलटण-लोणंद रेल्वे मार्गाच्या कामाला आला वेग

पुणे, 17 मेः कोरोना काळात बारामती-फलटण-लोणंद रेल्वे मार्गाचे काम रखडले होते. आता रेल्वे मार्गाच्या कामाला वेग आला आहे. बारामती ते फलटण या मार्गातील 13 गावांमधील जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेगाने केली जात आहे. ही प्रक्रिया जूनअखेर पूर्ण केली जाणार आहे. भूसंपादनाचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी या कामाचा दररोज आढावा घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितली आहे.

दरम्यान, या रेल्वेमार्गापैकी फलटण ते लोणंद मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, बारामती ते फलटण या मार्गातील भूसंपादनाचे काम अद्याप अपूर्ण असल्याची माहिती समोर येत आहे. या मार्गातील लाटे व माळवाडी या दोन गावांमधील भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 13 गावांतील भूसंपादनाचे काम वेगाने होण्यासाठी नियोजन करण्यात आल्याचे वृत्त आहे.

‘बारामती ते फलटण रेल्वेमार्ग 37.20 किलोमीटर लांबीचा आहे. त्यामध्ये 15 गावांतील जमिनी ताब्यात घ्याव्या लागणार आहेत. दोन गावांतील भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित गावांतील भूसंपादन जून महिन्याअखेर पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादनाचा आढावा दररोज सायंकाळी 6.30 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात येत आहे.’ असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.

तत्पुर्वी, या रेल्वेमार्गासाठी 183 हेक्टर जमीन ताब्यात घ्यावी लागणार आहे. वाटाघाटीने भूसंपादन केले जाणार आहे. जमिनीची मोजणी आणि मूल्यांकनाचे प्रस्ताव वेगाने करण्यात येणार आहेत. भूसंपादन करताना निधीची कमतरता भासणार नाही. रेल्वे विभागाकडून 115 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यापैकी सुमारे 50 कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे. त्यामुळे जमीन मालकांना ताबडतोब मोबदला दिला जाणार आहे, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *