बारामती, 7 मेः बारामती शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार अकबर कादिर शेख (वय- 32, रा.खंडोबानगर, बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा संशयित आरोपी अकबर शेख यांच्या पत्नी यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे. पीडित पत्नीने संशयित आरोपीवर अनैसर्गिक संबंध ठेवत शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली. या तक्रारीवरून संशयित आरोपी अकबर शेख याच्यावर भादवि कलम 498 (अ), 504,506,377 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती शहर पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहर पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार अकबर शेख यांचा फिर्यादीसोबत विवाह आळंदी येथील श्रीकृष्ण कार्यालयात 31 मार्च 2018 रोजी संपन्न झाला. सदर विवाह हा आंतर जातीय असून त्या दोघांना दोन आपत्ती आहेत. मात्र आज पर्यंत फिर्यादीला आरोपीने त्याच्या बारामतीमधील घरी नेले नाही. तसेच त्यांच्या विवाह विषयी आरोपीच्या घरी सांगितले नाही.
आंतर जातीय विवाह झाल्यामुळे आरोपी हा फिर्यादीचा गैरफायदा घेत होते. पोलीस कर्मचारीचा धाक दाखवत आरोपी फिर्यादीचा सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. यामुळे जीवाच्या भीतीने फिर्यादीने गेल्या महिन्यापासून माहेरी मुक्कामी आहेत.
आरोपीकडून वारंवार फोन वरून धमकी दिल्याने फिर्यादी आणि तिच्या वडिलांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने तक्रार दाखल केली. सदर प्रकरणात बारामती शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे अधिक तपास करीत आहेत.