दूध भेसळ रॅकेटचे बारामती कनेक्शन?

बारामती, 20 जानेवारीः बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथून दूध भेसळीसाठी वापरले जाणारे द्रावण पुरवले जात असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या संदर्भात पंढरपूर ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिस हवालदार नवनाथ सावंत पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी, 15 जानेवारी 2023 रोजी रात्रगस्त करत होते. त्या रात्री 1 च्या सुमारास पोलिसांना दोन वाहने वाखरी -गुरसाळे बायपास फ्लाय ओव्हर पुलाजवळ संशयित दिसली. त्यांनी या वाहनांची पाहणी केली असता त्यामध्ये दूध भरण्याचे 19 रिकामे कॅन आणि दुसऱ्या वाहनात निळ्या रंगाचे प्लॅस्टिकचे 14 कॅन आढळून आले.

खासदार सुप्रिया सुळेंच्या बारामतीत कृषिमंत्री सत्तारांचे आगमन

निळ्या रंगाच्या कॅनमध्ये पांढऱ्या रंगाचे लिक्विड भरलेले होते. वाहनाजवळ उभा असलेला संशयित आरोपी निलेश भोईटे (वय 30, रा. रो- हाऊस क्रमांक 38, वृंदावनम सोसायटी, टाकळी, पंढरपूर) पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील श्री स्वामी समर्थ दूध संकलन केंद्राचा मालक परमेश्वर काळे (वय 40) आणि वाहनचालक गणेश गाडेकर (वय 25 रा. गणेश नर्सरी जवळ, टाकळी रोड, पंढरपूर) या तिघांकडे चौकशी केली असता त्यांनी हे द्रावण पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील श्री स्वामी समर्थ दूध संकलन केंद्राकडे दूधात भेसळण्याच्या हेतूने घेऊन जात असल्याचे सांगितले. संबंधित संशयित आरोपींनी हे द्रावण समीर मेहता (रा. वडगाव निंबाळकर ता. बारामती) यांच्याकडून आणले असल्याचेही सांगितले.

विद्या प्रतिष्ठान कॉलेजच्या अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे अपघाताचा धोका

दूधात भेसळ करण्यासाठी आणलेल्या लिक्विडसह पोलिसांनी छोटा हत्ती (एमएच सी.यु. 6628) वाहन आणि मानवी आरोग्यास अपायकारक ठरेल अशा द्रावणाचा सुमारे 2 लाख 9 हजार 500 रुपये किंमतीचा साठा जप्त केला. दरम्यान, संशयित आरोपी समीर मेहता याच्यावर यापुर्वी दुध भेसळ द्रावण तयार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. दुसऱ्यांदा पुन्हा अशाच प्रकारे लिक्विड पुरवण्याचे निष्पन्न झाल्याने बारामतीत दूध भेसळीचे रॅकेट सुरू असल्याचे सिद्ध होत आहे.

One Comment on “दूध भेसळ रॅकेटचे बारामती कनेक्शन?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *