बारामती, 5 नोव्हेंबरः राज्यातील सत्तांतरानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने विस्तारासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. माजी मंत्री विजय शिवतारे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. विजय शिवतारे हे आज, शनिवारी 5 नोव्हेंबर 2022 रोजी बारामती, इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
शिवसेनेतील बंडानंतर शिवतारे यांनी एकनाथ शिंदेंच्या गटासोबत जाणे पसंत केले होते. यापूर्वी शिवतारेंनी बारामती तालुक्यात मोठा जनसंपर्क ठेवला होता. गत निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांना आव्हान दिले होते. आता शिवतारे यांनी बारामतीवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण हाती घेतले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादीच्या विरोधकांना बुस्ट मिळाला.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी बारामतीचा दौरा करीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणला होता. त्यात आता शिवतारेंच्या दौऱ्याने अधिक बळ मिळणार आहे. बारामतीत भाजप व बाळासाहेबांची शिवसेना हे दोन्ही पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील आहेत. आगामी काळात नगर परिषदेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती आदींच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या दृष्टीनेही दोन्ही पक्षांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. बारामतीत आज, 5 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता शिवतारे हे तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. बारामती शहरातील कृष्णसागर हॉटेल येथे ही बैठक होणार आहे. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
One Comment on “विजय शिवतारेंचा आज बारामती दौरा”