बारामती नगरपरिषद मधील ‘लिफ्ट बंद’; नागरिकांची वाढती गैरसोय

बारामती नगरपरिषद लिफ्ट बंद

बारामती, 09 जून: (अभिजित कांबळे) बारामती नगरपरिषद प्रशासन विभागातील लिफ्ट बंद होऊन तब्बल एक आठवडा उलटून गेला असून, त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः वृद्ध, अपंग, महिला आणि लहान मुलांसोबत येणाऱ्यांना वरच्या मजल्यावरील कार्यालयांपर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण बनले आहे.

नागरिकांना नाहक त्रास

बारामती नगरपरिषदेच्या प्रशासन विभागातील विविध कार्यालयांमध्ये नोंदणी, प्रमाणपत्र, मंजुरी अशा आवश्यक कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. मात्र, लिफ्ट बंद असल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी तसेच दिव्यांग व्यक्तींनी आपली कामं पुढे ढकलली असून काहींना पायऱ्या चढणे शक्य न झाल्याने रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.

नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण

या अडचणीमुळे त्यामुळे अनेकांना वेळ व श्रम वाया घालवावे लागत आहेत. या लिफ्टबाबत प्रशासनाकडे एकापेक्षा अधिक वेळा तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लिफ्ट तत्काळ दुरूस्त करण्याची मागणी

“नित्यनेमाने येणाऱ्या नागरिकांसाठी ही लिफ्ट गरजेची आहे. आठवडाभर होऊनसुद्धा ती दुरुस्त न होणं म्हणजे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं उदाहरण आहे,” अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नागरिकांनी दिली आहे. नागरिकांनी लवकरात लवकर लिफ्ट दुरुस्त करून ती कार्यान्वित करण्याची मागणी केली असून, भविष्यात देखभाल-दुरुस्तीचं नियोजन वेळोवेळी होणं गरजेचं असल्याचं मतही व्यक्त केलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *