बारामती, 11 ऑक्टोबरः बारामती तालुक्यातील पणदरे एमआयडीसी क्षेत्रात लघुउद्योगांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्यानुसार वीज व पाणीपुरवठा सेवा समाधानकारक नाहीत. यामुळे एमआयडीसीमधील उद्योगांची गैरसोय होत असून मोठे आर्थिक नुकसानही होत आहे.
बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या माध्यमातून लघु उद्योगाच्या अडचणी संबंधित विभागांकडे मांडल्या आहे. आपण स्वतः पाठपुरावा करून येथील लघु उद्योजकांच्या समस्या सोडवू, अशी ग्वाही बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिली. पणदरे एमआयडीसीमधील उद्योजकांनी एकत्र येऊन स्वखर्चाने उभारलेल्या उद्योगांच्या नामसूची फलकाचे उद्घाटन अध्यक्ष धनंजय जामदार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्यानंतर आयोजित उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते.
विशेष महिला ग्रामसभेचे भिलारवाडीत आयोजन
पणदरे एमआयडीसीमध्ये जवळपास 40 लघुउद्योग कार्यरत आहेत. या उद्योगांमध्ये प्लास्टिक एक्सट्यूजन, पीव्हीसी पाईप, सीएनसी मशीन्स, फॅब्रिकेशन, नोटबुक मनुफॅक्चरिंग, फर्निचर, बेकरी आदी विविध प्रकारचे लघुउद्योग कार्यरत आहेत. या लघुउद्योगिक क्षेत्राला अखंडित वीजपुरवठा होणे गरजेचे आहे. परंतु महावितरण याकडे दुर्लक्ष करत आहे. गावठाण फिडरवरून या क्षेत्राला विद्युत पुरवठा होत असल्याने वारंवार ट्रिपिंग, वोल्टेजमध्ये चढ-उतार, भारनियमन आदींमुळे उद्योजकांच्या मशनरीचे, खास करून पीव्हीसी व प्लास्टिक उत्पादकांचे प्रचंड आर्थिक नुकसान वारंवार होत आहे.
पणदरे एमआयडीसी लगत खाजगी जागेत काही उद्योजकांनी नवीन वीज पुरवठा मागितला आहे. मात्र महावितरणकडून अद्याप दिलेला नाही. या परिसरात अनेक खडीक्रशर प्रकल्प उभारलेले आहेत. सदर खडी क्रशर चालू बंद करताना विद्युत पुरवठ्यावर ताण येऊन वारंवार ट्रिपिंग होत असते. यासाठी पणदरे एमआयडीसीला स्वतंत्र विद्युत पुरवठा असणे अत्यावश्यक आहे.
तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात
या एमआयडीसीला पाणीपुरवठा निरा डावा कालव्यातून होतो. सध्या एमआयडीसीची पाणी साठवून क्षमता केवळ 75 हजार लिटर इतकी तुटपुंजी आहे. तसेच साठवण टाकीला गळती लागलेली आहे. सदर ठिकाणी भविष्यातील विचार करून मोठ्या क्षमतेची साठवून टाकी उभारून उद्योगांना पूर्ण वेळ पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची मागणी उपस्थित उद्योजकांनी केली.
या बैठकीस बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, पणदरे एमआयडीसीमधील उद्योजक संजय पवार, सुभाष जगताप, प्रवीण जमदाडे, रमेश पटेल, उज्वल शहा, सुनील शिंदे, शिवाजी शिर्के, निलेश जगदाळे, सुरज कोकरे, नितीन जगताप, शेखर जगताप, किरण जगताप व ग्रामस्थ उपस्थित होते.