बारामती, 08 जून: (विश्वजीत खाटमोडे) गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतर्क झालेल्या माळेगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासांत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून मोबाईल आणि रोकड मिळून एकूण 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बारामती परिसरात चोरीच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी गुन्हे उघड करण्यासाठी आणि प्रतिबंध घालण्यासाठी विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस गस्त वाढविण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?
या दरम्यान, दिनांक 3 जून 2025 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास बारामती तालुक्यातील पिंगळेवस्ती येथील भिमराव रामचंद्र पिंगळे हे पाहुणेवाडी गावच्या हद्दीतून मोटरसायकलवरून जात असताना, दोन अज्ञात इसमांनी त्यांना गाडी आडवी लावून मारहाण केली आणि त्यांच्याकडील विवो कंपनीचा मोबाईल व खिशातील 18 हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली.
फिर्यादीच्या तक्रारीनंतर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रभारी अधिकारी सचिन लोखंडे यांनी गुन्हे शोध पथकाला निर्देश दिले. चौकशीत फिर्यादीने सांगितले की, आरोपींमधील एकाने दुसऱ्याला अक्षय या नावाने संबोधले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक साधनांच्या मदतीने संशयित आरोपींचा शोध घेतला.
दोघांना अटक
त्यानुसार, पोलिसांनी अक्षय चंद्रकांत जाधव (वय 24, रा. खांडज, ता. बारामती) आणि मनोज उर्फ बाबू शिवराज गालफाडे (वय 19, रा. बुरूडगल्ली, पाहुणेवाडी, ता. बारामती) यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला विवो मोबाईल व 5 हजार रुपये रोख असा एकूण 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल
या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 309 (4), 309 (6) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे करत आहेत.
पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
या संपूर्ण कारवाईत बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या काटेकोर नियोजनाचे आणि दूरदृष्टीचे मोठे योगदान आहे. तसेच माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी दाखवलेली तत्परता, योग्य मार्गदर्शन आणि टीमवर्कमुळेच अवघ्या काही तासांत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले. त्यांनी आपल्या नेतृत्वातून गुन्हे शोध पथकाचे मनोबल उंचावले असून, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कामगिरी ठरली आहे. अशा अधिकाऱ्यांमुळेच पोलिसांवरील जनतेचा विश्वास अधिक बळकट होतो.