बारामती, 03 जून: (अभिजित कांबळे) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) अंतर्गत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग, डेहराडून ही संस्था ‘आऊटरीच दुरस्थ शिक्षण कार्यक्रम’ अंतर्गत विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना अंतराळ तंत्रज्ञान व भूस्थानिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रशिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे.
उक्त कार्यक्रमाद्वारे रिमोट सेन्सिंग, इको-इन्फॉरमॅटिक्स, शेती, नैसर्गिक संसाधने, पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापनासाठी जीपीएस तंत्रज्ञान तसेच इतर संबंधित क्षेत्रांमध्ये शिक्षण व प्रशिक्षणाची महत्त्वपूर्ण संधी दिली जाते.
या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आय.आय.आर.एस., डेहराडून यांनी बारामती येथील शारदानगरच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या नामवंत संस्थेची निवड केली आहे. ट्रस्टच्या अंतर्गत कार्यरत डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालय तसेच इतर सर्व संबंधित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना या कार्यक्रमांतर्गत विविध अभ्यासक्रमांचा लाभ घेता येणार आहे.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्याचा उद्देश बाळगतो. यामुळे कृषी व विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग कृषी व पर्यावरण व्यवस्थापनात कसा करता येईल, हे शिकण्याची संधी मिळणार आहे.
कार्यक्रमांतर्गत ई-लर्निंग व लाईव्ह इंटरॲक्टिव्ह मोडद्वारे प्रशिक्षण दिले जाणार असून, रिमोट सेन्सिंग, भौगोलिक माहिती प्रणाली, ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम व त्याच्या विविध उपयोगांवर सखोल मार्गदर्शन केले जाईल. या उपक्रमामुळे संशोधन व नवकल्पनांना नवे दिशा मिळणार आहेत.
या उपक्रमासाठी प्रा. राहुल बेलदार हे प्रमुख समन्वयक तर डॉ. पद्मकुमार पाटील हे सहयोगी समन्वयक म्हणून कार्य पाहणार आहेत. या गौरवप्राप्त निवडीबद्दल ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख श्री. राजेंद्र पवार यांनी ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.