बारामती, 21 मे: (विश्वजीत खाटमोडे) बारामती येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलोपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र याठिकाणी दिनांक 20 मे 2025 रोजी जागतिक मधमाशी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. धीरज शिंदे, प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, बारामती, श्री. चेतन पाटोळे, प्रकल्प व्यवस्थापक, आयसीआयसीआय फाउंडेशन, श्री. स्वप्निल ढेकळे, डेव्हलपमेंट ऑफिसर, आयसीआयसीआय फाउंडेशन, डॉ. रतन जाधव, विषय विशेषतज्ञ (पशु संवर्धन), कृषी विज्ञान केंद्र बारामती हे उपस्थित होते. डॉ. धीरज शिंदे, प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांनी कृषि क्षेत्रात मधमाशीचे अनन्य साधारण महत्व सांगत रोजगार निर्मितीसाठी मधुमक्षिका पालन हे कशा पद्धतीने उपयोगी ठरेल यावर मार्गदर्शन केले.
डॉ. मिलिंद जोशी, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण), कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांनी मधमाशीच्या विविध जाती, मधमाशीचे परागीभवनात महत्व सांगत, मध आणि मधाचे विविध पदार्थ व त्यांच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी ॲग्रीकल्चरल डेव्हलोपमेंट ट्रस्ट आणि राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीडीबी) आनंद, गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यांमध्ये मधमाशीच्या स्थापन केलेल्या शेतकरी उत्पादक कंपनी बद्दल माहिती देत केंद्रात चालू असलेल्या अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (एआयसीआरपी) याबद्दल सखोल अशे मार्गदर्शन केले.
श्री.संतोष गोडसे, विषय विषेशज्ञ (कृषि विस्तार) कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांनी कृषी विज्ञान केंद्र बारामती अंतर्गत केंद्रातील विविध उपक्रमांची माहिती दिली. श्री. विश्वजीत वाबळे यांनी शेतीमधील मधमाशीचे महत्व सांगत सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून सर्वांनी सेंद्रिय शेती करावी व त्यामध्ये मधमाशीचा वापर करावा असे आवाहन केले. श्री अल्पेश वाघ, प्रकल्प सहयोगी, कृषी विज्ञान केंद्र बारामती आणी श्री सचिन शिरसागर यांनी मधमाशी उत्पादनांचे विक्रीव्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले तसेच प्रात्यक्षिकांसहित मधमाशीची योग्य हाताळणी आणि नैसर्गिक पद्धतीने शुद्ध मधाची काढणी यावर माहिती दिली.
श्री. प्रशांत गावडे, मधमाशी तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांनी मधमाशी पासून मिळणारे विविध उत्पादने यांविषयी माहिती देत उपस्थित शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत मधमाशीपासून मिळणाऱ्या पदार्थांचे महत्व व्यक्त करत कार्यक्रमाचे आभार मानले. श्री आशिष भोसले, प्रकल्प सहाय्यक, कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या यावेळी पुणे जिल्ह्यातील एकूण 138 शेतकरी उपस्थित होते.