मुंबई, 19 मे: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय हवामान विभागाने मुंबईसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा, विजांसह गडगडाट आणि वाऱ्याचा इशारा दिला आहे. सध्या मान्सून पूर्व पावसाने मुंबईत हजेरी लावली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने 20 मेपासून ते 22 मेपर्यंत मुंबईसह परिसरात यलो अलर्ट जारी केला आहे. याची माहिती भारतीय हवामान विभागाने सोमवारी (दि.19) दिली आहे.
मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता
मुंबई आणि पालघर जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवसांमध्ये विजांचा कडकडाट, वाऱ्यासह पाऊस आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे येण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठीही विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.
इतर भागांतही पावसाचा अंदाज
त्याचबरोबर कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या भागांतही सोमवारी (दि.19) दिवशी काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा आणि ताशी 50 ते 60 किमी वेगाने वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई क्षेत्रीय हवामान केंद्रानुसार, दक्षिण कोकण-गोवा आणि मराठवाडा विभागातही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात 21 आणि 22 मे रोजी अतिवृष्टी, विजांचा कडकडाट आणि ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. उत्तर कोकणातही अशा प्रकारच्या हवामानाची शक्यता आहे.
मुंबईत पावसाचे वातावरण
मुंबईत शनिवारी (दि.17) सकाळपासूनच पावसाने सुरुवात झाली असून, उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. आज दिवसभर आकाश ढगाळ राहील आणि हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पाच दिवस पावसाचा अंदाज
दरम्यान, हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अखिल श्रीवास्तव यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, दक्षिण भारतातील तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक राज्यांमध्येही पुढील पाच दिवस सतत पाऊस, वादळ आणि वाऱ्याचा अनुभव येणार आहे.