दिल्ली, 15 मे: (विश्वजीत खाटमोडे) भारत-म्यानमार सीमेवर भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत 10 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. लष्कराच्या ईस्टर्न कमांडने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती शेअर केली आहे. भारताच्या पूर्व सीमेवर ही कारवाई अशा वेळी झाली आहे, जेव्हा अलीकडेच भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केली होती. या कारवाईनंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
https://x.com/easterncomd/status/1922712254467944564?t=hbQ139MmPvzAMV08qppLYQ&s=19
लष्कराच्या ईस्टर्न कमांडने मध्यरात्री एक्सवर पोस्ट करत सांगितले की, “भारत-म्यानमार सीमेच्या जवळ असलेल्या मणिपूर राज्यातील चंदेल जिल्ह्यातील खेगजॉय तहसीलमधील न्यू समतल गावाजवळ दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर 14 मे रोजी असम रायफल्सच्या युनिटने स्पीयर कॉर्प्सच्या अंतर्गत विशेष ऑपरेशन राबवले.
10 अतिरेक्यांचा खात्मा
“लष्कराने पुढे सांगितले की, “ऑपरेशनदरम्यान संशयित दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार सुरू केला. त्यास लष्कराच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत 10 अतिरेकी ठार झाले असून त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.” ही कारवाई मणिपूरमध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांसाठी एक मोठे यश मानले जात आहे. ईस्टर्न कमांडनुसार हे ऑपरेशन अद्याप सुरू आहे.
भारत सरकारचा मोठा निर्णय
दरम्यान, केंद्र सरकारने म्यानमारमधून होणारी बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी भारत-म्यानमार सीमेवरील सीमा कुंपण आणि रस्ते बांधण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार केंद्र सरकारने याआधीच या सीमावर्ती भागात 1610 किलोमीटर लांब बंधारे उभारण्याचा आणि सीमा रस्ते विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 31 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यास सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने सैद्धांतिक मंजुरी दिली आहे.
संपूर्ण घटनेचा विचार करता, लष्कराची ही कारवाई केवळ दहशतवाद्यांच्या धोक्याला रोखण्यासाठीच नव्हे तर सीमावर्ती सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे.