पुणे, 13 मे: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज (दि.13) दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल 94.10 टक्के लागला असून, कोकण विभागाने 99.82 टक्के निकालासह सर्वोच्च स्थान पटकावले आहे. तर सर्वात कमी निकाल 90.78 टक्के इतका नागपूर विभागाचा लागला आहे.
14.55 लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण
राज्यात एकूण 16.11 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये 8.6 लाख मुले, 7.47 लाख मुली यांचा समावेश होता. यातील एकूण 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी पास झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेली इयत्ता दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान पार पडली होती.
अधिकृत संकेतस्थळावर निकाल उपलब्ध
यंदाही मुलींनी निकालात आघाडी घेतली असून, सरासरी टक्केवारीनुसार त्यांनी मुलांना मागे टाकले आहे. निकाल आज दुपारी 1 वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांसह इतर मान्यताप्राप्त वेबसाईटवर उपलब्ध झाला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमार्फत गुणपत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे.
विभागाच्या निकालाची टक्केवारी –
कोकण : 99.82%
कोल्हापूर : 96.78%
मुंबई : 95.84%
पुणे : 94.81%
नाशिक : 93.04%
अमरावती : 92.95%
संभाजीनगर : 92.82%
लातूर : 92.77%
नागपूर : 90.78%
राज्यभरात निकालावर समाधान व्यक्त होत असून, यंदा अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करून भविष्यासाठी आपली वाट मोकळी केली आहे.