डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘जनता’ वृत्तपत्राचे नवे 3 खंड आणि भाषांतराचे प्रकाशन

मुंबई, 30 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित झालेल्या ‘जनता’ या ऐतिहासिक वृत्तपत्राच्या खंड 7, 8 आणि 9 चा तसेच इंग्रजी खंड 4 च्या मराठी भाषांतराचा आणि इंग्रजी खंड 2 च्या नव्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच मंत्रालयात पार पडला.

https://x.com/CMOMaharashtra/status/1917171199723143544?t=KKo97tUnPZrpAkQbFAe4eg&s=19



या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीमार्फत या खंडांची निर्मिती करण्यात आली आहे. याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.



जनता’ हे वृत्तपत्र सन 1930 ते 1956 दरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रकाशित झाले होते. आंबेडकरी चळवळीचा महत्त्वाचा दस्तऐवज ठरलेले हे वृत्तपत्र आजही संशोधक व वाचकांसाठी मोलाचे साहित्य आहे. महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व्यापक प्रसार व्हावा यासाठी त्यांच्या अप्रकाशित आणि प्रकाशित साहित्याचे पुन्हा प्रकाशन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

जनता खंडांमध्ये किती अंक?

याअंतर्गत ‘जनता’च्या खंड 7 मध्ये 12 फेब्रुवारी 1938 ते 28 जानेवारी 1939 या कालावधीत प्रकाशित 48 अंकांचा समावेश आहे. खंड 8 मध्ये 4 फेब्रुवारी 1939 ते 27 जानेवारी 1940 या कालखंडातील 48 अंकांचा समावेश आहे. तर खंड 9 मध्ये 3 फेब्रुवारी 1940 ते 1 फेब्रुवारी 1941 या दरम्यान प्रकाशित 48 अंकांचा समावेश करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण प्रकाशनामुळे डॉ. आंबेडकर यांचे विचार व चळवळीचे ऐतिहासिक दस्तऐवज नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास निश्चितच मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *