पुणे, 30 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरातील घरफोडी प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी केलेल्या तपासातून गुन्हा उघडकीस आणत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे 5 लाख 25 हजार रुपये किमतीची 95 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली असून, ती फिर्यादींना सुपूर्द करण्यात आली आहे. याची माहिती पुणे शहर पोलिसांनी दिली आहे.

एक वर्षापूर्वीची घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 23 मे 2024 रोजी रात्री 11 वाजता ते दि. 24 मे 2024 रोजी सकाळी 8 वाजता या कालावधीत बिबवेवाडी येथील फिर्यादी श्रीनिवास रेवले यांचे मामा जितेंद्र गंगाधर साखरे यांच्या मालकीच्या गुंफन अपार्टमेंटमधील फ्लॅट नं. 11 (सर्वे नं. 553, बिबवेवाडी, पुणे) येथे अज्ञात चोरट्यांनी लोखंडी आणि लाकडी दरवाज्याचे कोयंडे तोडून प्रवेश केला होता. मास्टर बेडरूममधील लाकडी कपाटाचे लॉकर उचकटून घरफोडी व चोरी करण्यात आली होती. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

5.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
तर या गुन्ह्यातील आरोपी विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी (वय 35, रा. साईबाबा मंदिराजवळ, रामटेकडी, हडपसर, पुणे) आणि अब्दुला ताहिरबक्ष शेख (वय 58, रा. फ्लॅट नं. 717, पनामापार्क सोसायटी, पोरवाल रोड, धानोरी, पुणे) यांना अटक करून त्यांच्याकडून 5.25 लाख रुपये किमतीची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली होती.

मुद्देमाल फिर्यादींना सुपूर्द
ही हस्तगत केलेली मालमत्ता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानुसार, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते मूळ मालक जितेंद्र गंगाधर साखरे यांच्याकडे परत देण्यात आली. यावेळी त्यांनी पोलिसांचे आभार मानले. याप्रसंगी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

