पहलगाम हल्ल्यानंतर राज्य सरकारच्या मदतीने 500 पर्यटक सुरक्षित परतले

पहलगाम हल्ला: पर्यटक महाराष्ट्रात परतले

मुंबई, 25 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ हालचाली करत राज्यातील अडकलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी पावले उचलली आहेत. गेल्या दोन दिवसांत सुमारे 500 पर्यटकांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात परत आणण्यात आले आहे.

https://x.com/CMOMaharashtra/status/1915457057840652473?t=wW7p4BElBhz4rylzMRG2cw&s=19



राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया या विमान कंपन्यांच्या सहकार्याने विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. काल (दि.24) दोन विशेष विमानांद्वारे 184 प्रवासी मुंबईत दाखल झाले. आज (दि.25) आणखी 232 प्रवाशांना घेऊन इंडिगोचे तिसरे विशेष विमान श्रीनगरहून मुंबईकडे रवाना होणार आहे. हे विमान आज दुपारी श्रीनगर येथून उड्डाण घेऊन सायंकाळी मुंबईत पोहोचणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.



आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना थेट काश्मीरला पाठवण्यात आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलद्वारे रुग्णालयात दाखल झालेल्या जखमी पर्यटकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आहे. मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदन यांच्या समन्वयातून त्रिस्तरीय यंत्रणा कार्यरत असून, पर्यटकांच्या मदतीसाठी अखंड प्रयत्न सुरू आहेत. जम्मूमधील कालिका धाम येथे काही पर्यटकांसाठी निवासाची तर दिल्लीमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले आहे.



राज्य सरकारने गरज भासल्यास आणखी विशेष विमानांची व्यवस्था करण्याची तयारी ठेवली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक पर्यटकाची सुरक्षित परतफेर सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन सतत कार्यरत आहे, असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांसाठी हा मोठा दिलासा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *