मुंबई, 23 एप्रिलः (विश्वजीत खाटमोडे) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी (दि. 22 एप्रिल) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या गोळीबारात 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचाही समावेश आहे. याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने आज (दि.23) दिली आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
https://x.com/CMOMaharashtra/status/1914932439878685156?t=AkrOZGkl3isg6yuMTWzY3g&s=19
मृतांमध्ये डोंबिवलीतील तिघांचा समावेश
मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या सर्वांचे पार्थिव आज राज्यात आणले जाणार आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती
संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव एअर इंडियाच्या विमानाने श्रीनगरहून मुंबईत आणले जाणार असून, हे विमान दुपारी 12.15 वाजता श्रीनगर येथून सुटेल. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव सायंकाळी 6 वाजता निघेल आणि पुण्यात पोहोचवले जाईल. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन दुसरे विमान दुपारी 1.15 वाजता श्रीनगरहून मुंबईकडे रवाना होईल, अशी माहितीही मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
परिस्थितीवर राज्य सरकारचे लक्ष
दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारची मदत तत्परतेने करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.
इतर पर्यटकांना सुखरूप आणले जाणार
यासोबतच जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या इतर पर्यटकांना देखील सुखरूप परत आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.