जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ला! एकाचा मृत्यू, 12 जण जखमी

जम्मू-काश्मीर, 22 एप्रिलः (विश्वजीत खाटमोडे) जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम परिसरातील बैसरन व्हॅली येथे आज (दि. 22) घडलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. आज दुपारी अडीच वाजता हा हल्ला झाला. बैसरन मैदानावर घोडेस्वारीचा आनंद घेत असलेल्या पर्यटकांवर काही अज्ञात दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. या गोळीबारात सुमारे 12 पर्यटक जखमी झाले असून, काही प्रसारमाध्यमांनी एका पर्यटकाच्या मृत्यूची माहिती दिली आहे. मात्र, अद्याप अधिकृत आकडेवारी स्पष्ट झालेली नाही.

https://x.com/AHindinews/status/1914645775398916251?t=CpWAwOkKK7eIOKmb9QIqNA&s=19

शोधमोहीम सुरू

हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, सुरक्षा दलांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संपूर्ण भाग सील केला आहे. सध्या दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे अभियान सुरू आहे. त्यामुळे लवकरच हे दहशतवादी सापडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जखमींवर रुग्णालयात उपचार

या घटनेनंतर सुरक्षा दलांसह वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले असून, मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जखमी पर्यटकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष आहे.

पहलगाम प्रसिद्ध पर्यटनस्थळ

पहलगामपासून काही किलोमीटर अंतरावर असलेले बैसरन व्हॅली हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देण्यासाठी येतात. आज पहलगाम परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होती. या हल्ल्यामुळे पर्यटनावरही भीतीचे सावट पसरले आहे. या पार्श्वभूमीवर, स्थानिक प्रशासनाकडून अतिरिक्त सुरक्षा वाढवण्यात आली असून, पर्यटकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर प्रशासन सतर्क झाले असून, या हल्ल्यामागील दहशतवादी संघटनांची ओळख पटवण्याचे काम गतीने सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *