भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपात जाहीर प्रवेश!

संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करताना

मुंबई, 22 एप्रिलः (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी मंगळवारी (दि. 22 एप्रिल) भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस नेतृत्वावर नाराज असलेल्या थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला.

https://x.com/cbawankule/status/1914622847265210420?t=VesjyJN9EsTmM9HpJLSAOw&s=19

प्रमुख नेत्यांची उपस्थिती

मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संग्राम थोपटे यांनी भाजपात पक्षप्रवेश केला. यावेळी भाजप नेते राहुल कुल, राधाकृष्ण विखे पाटील तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला.

सलग तीनदा आमदार

संग्राम थोपटे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सहा वेळा आमदार राहिलेले अनंतराव थोपटे यांचे पुत्र आहेत. संग्राम थोपटे यांनी 2009, 2014 आणि 2019 या सलग तीनही विधानसभा निवडणुकांमध्ये पुणे जिल्ह्यातील भोर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला होता.

विधानसभा निवडणुकीत पराभव

मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी त्यांना 19,638 मतांनी पराभूत केले. या निवडणुकीत चौरंगी लढतीचे चित्र पाहायला मिळाले होते. तेंव्हा या निवडणुकीत काँग्रेसकडून संग्राम थोपटे, राष्ट्रवादीकडून शंकर मांडेकर, भाजपकडून किरण दगडे पाटील हे अपक्ष आणि शिवसेनेचे कुलदीप कोंडे हे देखील अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होते. त्यामुळे मतविभागणी होऊन संग्राम थोपटे यांचा पराभव झाला. दरम्यान, संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशामुळे आता भोर मतदारसंघासह पुणे जिल्ह्यात भाजपच्या ताकदीत वाढ होणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *