नाशिक, 22 एप्रिलः (विश्वजीत खाटमोडे) उन्हाळ्यामुळे सध्या महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तापमान सतत वाढत असल्याने विहिरी, नद्या आणि तलाव कोरडे पडत आहेत. अनेक ठिकाणी भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्यामुळे हातपंप बंद पडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना रोजच्या जीवनात प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महिलांवर याचे सर्वात मोठे ओझे पडत असून त्यांना लांब पल्ल्याचा प्रवास करून पाणी आणावे लागत आहे. शासनाने या गावांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
https://x.com/ANI/status/1914493838338543970?t=44JQdVqG50dHc12LEkS2nw&s=19
दिवसेंदिवस वाढते संकट
महाराष्ट्रात सध्या उन्हाळ्याचे चटके वाढत चालले आहेत. त्यामुळे अनेक भागांत पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील विदर्भ आणि खानदेशातील अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई भीषण बनली आहे. विशेषतः यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील गावांमध्ये महिलांना रोजच्या गरजेसाठी पाणी मिळवण्यासाठी दोन ते तीन किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे.
https://x.com/ANI/status/1914495217761460413?t=V-UK3ECiQItaSiTxrLQLSg&s=19
यासंदर्भात येथील एका स्थानिक महिलेने सांगितले की, “आम्हाला दूरवरून पाणी आणावे लागते. पाणी आणताना आम्हाला घसरण्याची भीती वाटते. रस्ते खाचखळग्यांचे आहेत, चालणे कठीण जाते. परंतु पाण्याची गरज आहे. गावातील विहिरी व हातपंप कोरडे पडल्याने महिलांना रोजच्या रोज अशा खडतर प्रवासाला सामोरे जावे लागत आहे.
https://x.com/ANI/status/1914507888392798388?t=smqBmto6mvnqmyVEfi3vLA&s=19
बोरीचिवारी गावातील दाहक वास्तव
नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील बोरीचिवारी गावाची स्थितीही वेगळी नाही. गावातील महिला उन्हातान्हात दोन किलोमीटर चालत जाऊन पाणी आणतात. गावात पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नसल्यामुळे, महिला आळीपाळीने स्वतःला विहिरीत उतरवतात, बहुतेकदा सुरक्षिततेसाठी त्यांच्याकडे दोरीशिवाय दुसरे काहीही नसते.
एका महिलेने सांगितले की, “आम्हाला रोज पिण्याच्या पाण्यासाठी एवढा मोठा प्रवास करावा लागतो. बऱ्याचदा महिला आजारी पडतात, काही वेळा पाणी आणताना घसरून पडतात. गावात कुठेच पाण्याचा स्रोत नाही.” दुसरी महिला म्हणाली, “सगळी मेहनत करून फक्त एक माठ पाणी मिळतो. तो पुरेसा नाही. आम्ही पाणी उकळतो, पण तरीही मुलं आजारी पडतात. अनेकदा तक्रारी केल्या पण अजून मदत मिळालेली नाही.”
आर्थिक भार सहन करावा लागतोय
पाण्याच्या टंचाईमुळे तेथील ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावरच परिणाम झाला नाही तर त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भारही पडला आहे. महिलांना पाणी आणण्यासाठी जवळजवळ 2 किलोमीटर चालावे लागते. ज्यांना एवढा प्रवास करता येत नाही, त्यांना फक्त थोडेसे पाणी मिळवण्यासाठी इतरांना अंदाजे 60 रुपये द्यावे लागतात.
पाण्यासाठी 7-8 किलोमीटरचा प्रवास
नंदुरबार जिल्ह्यातील धानगाव हे गाव सुद्धा तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहे. उन्हाळा सुरू झाल्यापासून या गावातील महिलांना 7 ते 8 किलोमीटर अंतर पार करून पाणी आणावे लागत आहे. या गावात ना पक्के रस्ते, ना वाहनाची सोय. गावकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाकडे मागणी केली, पण अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही.
तत्काळ उपाययोजनांची गरज
पाणीटंचाईमुळे फक्त दैनंदिन जीवनच विस्कळीत होत नाही, तर त्याचा आर्थिक आणि आरोग्यावरही विपरीत परिणाम होतोय. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे टँकरने पाणीपुरवठा करणे, शाश्वत पाणी स्रोतांची उभारणी करणे यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे. परिस्थिती आणखी बिघडण्यापूर्वी उपाययोजना करणं गरजेचं आहे.