भोर, 22 एप्रिलः (विश्वजीत खाटमोडे) भोर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते आज (दि.22) भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांनी शनिवारी (दि.19) प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राजीनामा सादर केला. रविवारी (दि.20) त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा केली.
“मी 22 एप्रिल रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे,” अशी माहिती संग्राम थोपटे यांनी दिली. “भोर मतदारसंघात विकास घडवून आणण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश हा एकमेव पर्याय आहे. या निर्णयाला मतदारसंघातील जनतेचा पाठिंबा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
तीन वर्षे आमदार राहिले
दरम्यान, संग्राम थोपटे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भोरचे माजी आमदार अनंतराव थोपटे यांचे पुत्र आहेत. थोपटे कुटुंबीयांचा भोर मतदारसंघात तब्बल 45 वर्षांपासून राजकीय प्रभाव राहिला आहे. अनंतराव थोपटे हे भोरमधून 6 वेळा आमदार राहिले, तर संग्राम थोपटे हे भोर विधानसभा मतदारसंघात तीन वेळा निवडून आले. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
काँग्रेसला मोठा धक्का
संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशामुळे भोरच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर पक्ष संघटनाही कमजोर होण्याचा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. भोरमध्ये थोपटे कुटुंबाचा प्रभाव लक्षात घेता, त्यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे आगामी निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलू शकते. त्यामुळे नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.