बारामती, 27 ऑगस्टः साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे, अशी भूमिका झोपडपट्टी सुरक्षा दलाचे आणि कामगार सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती महोत्सवानिमित्त बारामती शहरातील आयोजित कार्यक्रमात बोलताना मांडली.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, अण्णाभाऊ साठेंचे साहित्य हे प्रतिभावंत असून ते वास्तववादी आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या कथेतील प्रत्येक नायक हा बंडखोर आहे. त्यामुळे अण्णा भाऊंच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना लवकरात लवकर भारतरत्न हा किताब देण्यात यावा.
समाजातील उपेक्षित वर्गाला व गरजूंना मदत करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, हे समाजातील प्रत्येक क्रियाशील कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे, असे सांगून झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्य संघटक तानाजी पाथरकर यांनी अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे वैराट यांनी कौतुक केले.
बारामती शहर पोलिसांची कॉलेज, शाळा परिसरात पुन्हा कारवाई
बारामती शहरामध्ये झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्य संघटक तानाजी पाथरकर व त्यांच्या सहकार्यांच्या वतीने जयंती महोत्सवानिमित्त महिलांना साडी वाटप केले. यासह विद्यार्थ्यांना गणवेशसह वह्या वाटप केले. तसेच सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तींना समाज गौरव पुरस्काराने सन्मानित केले. यासह दहावी- बारावी मधील पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल माजी नगरसेवक सत्यव्रत काळे, सिल्व्हर ज्युबिली शासकीय रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. सदानंद काळे, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, बा.न.प.उद्यान विभागाचे माजिद पठाण, शिक्षण मंडळाचे माजी सभापती माधव जोशी, सामाजिक कार्यकर्ते संतोष सातव, पत्रकार दै.राष्ट्र सह्याद्रीचे प्रतिनिधी सुरज देवकाते, सत्य समिक्षाचे संपादक निलेश जाधव यांना अण्णाभाऊ साठे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष इम्तियाज शिकिलकर, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे दत्तात्रय डाडर, दत्ता कांबळे, शिवाजी भिसे, आबा चव्हाण, आबासाहेब शिंदे, प्रतिभा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत कुचेकर, राहुल मोरे, राजू खलसे, बापू खंडाळे, बापू पाथरकर, देवानंद मोरे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.