बारामती, 09 एप्रिल: बारामती तालुक्यातील शिरष्णे-लाटे मार्गावर दुचाकीस्वार गणेश बनकर यांच्या अपघातप्रकरणी लोकन्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या गणेश बनकर यांच्या कुटुंबाला विमा कंपनीकडून 30 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दि. 15 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास गणेश विठ्ठल बनकर (रा. माळवाडी, लाटे, ता. बारामती) हे आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. त्याच वेळी, शिरष्णे-लाटे रोडवरील महादेव पुलाजवळ एका छोटा हत्ती वाहनाने चुकीच्या बाजूने येत गणेश बनकर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गणेश बनकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर मृत गणेश बनकर यांचे वडील विठ्ठल बनकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढे हे प्रकरण न्यायालयात नेण्यात आले. गणेश बनकर कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी बारामती जिल्हा व सत्र न्यायालयात प्रयत्न केले. प्रकरणाचा शेवट लोकन्यायालयात झाला, जिथे ॲड. किरण सोनवणे आणि ॲड. सुरेखा कांबळे यांनी मृताच्या कुटुंबीयांच्या वतीने काम पाहिले.
सर्व पुरावे दाखल केल्यानंतर, संबंधित विमा कंपनीला गणेश बनकर यांच्या कुटुंबाला 30 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. यामुळे पीडित कुटुंबाला काही प्रमाणात आधार मिळाला असून, हा निकाल इतर अपघात पीडितांसाठीही महत्त्वाचा ठरू शकतो.