पुणे, 07 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरातील वारजे माळवाडी परिसरातील अष्टविनायक चौकात असलेल्या एका दागिन्यांच्या दुकानात चोरी झाल्याची घटना घडली होती. ही घटना 22 मार्च रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी मोठे यश मिळवत आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून एकूण 4.27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संपूर्णानंद परमानंद वर्मा (वय 43, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे या आरोपीचे नाव आहे. याची माहिती पुणे शहर पोलिसांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या मुलासोबत नेहमीप्रमाणे दुकानात काम करत होत्या. त्या दररोज 2 लाख 57 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि 2 लाख रुपये रोख रक्कम घरी ठेवण्याऐवजी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दुकानात घेऊन येत असत. तसेच घरी जाताना हा ऐवज पुन्हा घेऊन जात असत. परंतु, 22 मार्च रोजी त्यांच्या दुकानात मोठी गर्दी झाली. या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या एकूण 4 लाख 57 हजार रुपयांच्या ऐवजावर हात साफ केला. रात्री 8 च्या सुमारास चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, भारतीय न्याय संहिता कलम 305 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
आरोपीला अटक
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गुप्त माहितीच्या आधारे वारजे येथील अतुलनगरमध्ये छापा टाकून आरोपी संपूर्णानंद वर्मा याला अटक केली. तो व्यवसायाने सराफ असून त्याने पत्नीसोबत मिळून ही चोरी केली होती असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी
पोलिसांनी आरोपीकडून 2 लाख रुपयांची रोकड, 17 हजार रुपये किमतीचे 250 ग्रॅम चांदीचे दागिने आणि 2 लाख 10 हजार रुपये किमतीचे 67 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 4 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होताच जप्त मुद्देमाल फिर्यादींना परत देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.