अयोध्या, 06 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) देशभरात आज (दि.06) रामनवमीचा पवित्र सण मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. भगवान श्रीरामांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून देशातील विविध भागांतील मंदिरांमध्ये विशेष पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळपासूनच मंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, “जय श्रीराम” च्या गजराने वातावरण भक्तिमय झाले आहे.
अयोध्या नगरीत भाविकांची गर्दी
भगवान श्रीरामांच्या जन्मस्थळी अयोध्या नगरीत रामनवमीचा विशेष उत्सव अत्यंत भव्य स्वरूपात साजरा होत आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात आज प्रभू रामांचा ‘सूर्यतिलक’ सोहळा पार पडणार आहे, ज्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या ऐतिहासिक आणि दिव्य प्रसंगासाठी देशभरातून लाखो भक्त अयोध्येत दाखल झाले आहेत. मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने सजवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत याठिकाणी मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
कडक सुरक्षा व्यवस्था
रामनवमीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासन सतर्क असून, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही ठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने देखील परिस्थितीवर नजर ठेवली जात आहे. दुसरीकडे, देशभरात देखील कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
देशभरात रामनवमीचा उत्साह
रामनवमी निमित्त देशभरात आज अनेक ठिकाणी भव्य शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. काही भागांत प्रशासनाकडून विशिष्ट अटी आणि नियमांसह शोभायात्रांना परवानगी देण्यात आली आहे. या शोभायात्रांमध्ये रामायणातील प्रसंगांचे देखावे, पारंपरिक वाद्यांची साथ, भक्तांचे गजर आणि सजवलेली रथयात्रा पाहायला मिळणार आहे.
https://x.com/narendramodi/status/1908693680837230672
पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रामनवमीच्या शुभप्रसंगी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. “सर्व देशवासियांना राम नवमीच्या अनेक शुभेच्छा. भगवान श्री राम यांच्या जयंतीचा हा पवित्र प्रसंग तुमच्या सर्वांच्या जीवनात नवीन चेतना आणि नवीन उत्साह घेऊन येवो, जो मजबूत, समृद्ध आणि सक्षम भारताच्या संकल्पाला सतत नवीन ऊर्जा प्रदान करेल. जय श्री राम!” “राम नवमीच्या सर्वांना शुभेच्छा! प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहो आणि आपल्या प्रत्येक कामात आपल्याला मार्गदर्शन करो. आज नंतर रामेश्वरमला जायला उत्सुक आहे!” असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.