पुणे, 05 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एका गर्भवती महिलेला पैशांशिवाय उपचार नाकारले आणि त्यामुळेच त्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने यावर अधिकृत स्पष्टीकरण देत आरोप फेटाळले आहेत. संबंधित महिला अत्यंत धोकादायक गरोदरपणातून जात होती, वेळोवेळी आवश्यक सल्ला दिला गेला होता, मात्र नातेवाईकांनी वैद्यकीय सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि चुकीचे आरोप केले असल्याचे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे.
रुग्णालय समितीच्या अहवालात काय?
रुग्णालयाच्या अहवालानुसार, मृत गर्भवती महिला तनिषा भिसे या 2020 पासून रुग्णालयात उपचारासाठी येत होत्या. 2022 साली त्यांच्यावर 50 टक्के चॅरिटीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया देखील झाली होती. 2023 मध्ये त्यांच्या गर्भधारणेतील धोक्याबाबत त्यांना माहिती देण्यात आली होती. 2025 मध्येही डॉक्टरांनी तपासणीतून जोखमीचे गरोदरपण असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच दर आठवड्याला त्यांना तपासणीस बोलावले होते. परंतु त्या आल्या नाहीत, असे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने म्हटले आहे.
पुढे, 28 मार्च रोजी तनिषा भिसे या बाह्यरुग्ण विभागात दाखल झाल्या. डॉक्टरांनी तपासणी करून भरती होण्याचा सल्ला दिला होता. उपचारांसाठी संभाव्य खर्च 10 ते 20 लाख रुपये येणार असल्याची माहिती दिली. डॉक्टर केळकर यांनी “जमतील तेवढे पैसे भरा” असेही सांगितले होते, असे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
चौकशी समितीचा निष्कर्ष
रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, नातेवाईकांनी चॅरिटी डिपार्टमेंटशी संपर्क साधला नाही व न सांगता रुग्णालाच दुसऱ्या रुग्णालयात घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या अंतर्गत चौकशी समितीच्या मते, रुग्णासाठी जुळ्या गरोदरपणाचा धोका होता. त्यांनी आवश्यक एएनसी तपासण्या त्यांनी रुग्णालयात करून घेतल्या नव्हत्या. रुग्णालयाने दिलेल्या वैद्यकीय सल्ल्याकडे दुर्लक्ष झाले. ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून सदर तक्रार केलेली दिसते. वैद्रद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून ऍडमिट होण्याचा सल्ला पण त्यांनी पाळला नाही. आगाऊ रक्कम मागितल्याच्या पार्श्वभूमीवर दिशाभूल करणारी तक्रार करण्यात आली आहे, असे रुग्णालय समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे याप्रकरणी पुढील कारवाई काय होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.