पुणे, 19 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) नागपूर येथे झालेल्या हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून 51 जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना आज (दि.19) जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने या सर्वांना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या सर्वांची आता पोलीस चौकशी करणार आहेत.
https://x.com/airnews_mumbai/status/1902261685509140651?t=usw-1sVbX_bPOiwbsQ8e7w&s=19
https://x.com/ANI/status/1902321539279933895?t=FyxEobVJQqLp-VnUUDYy5w&s=19
पोलीस आयुक्तांनी दिली माहिती
दरम्यान, नागपूर हिंसाचाराच्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. या घटनेबाबत नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी सविस्तर माहिती दिली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 50 आरोपी आणि 7 अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. आजही काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान झाले आहे, याचाही पोलीस तपास करत आहेत. पोलिसांकडून या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेतील आरोपींची भूमिका काय होती? याचा तपास पोलीस करत आहेत.
शहरात कडक पोलीस बंदबस्त
नागपूर मध्ये सध्या शांततापूर्ण परिस्थिती आहे. दरम्यान, या हिंसाचारानंतर शहरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलीस दलासोबत अतिरिक्त पथकेही तैनात असून, संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संचारबंदीमुळे नागरिकांना अनावश्यक हालचाली टाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी जनतेला अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांती राखण्याचे आवाहन केले आहे.
33 पोलीस जखमी
दरम्यान, नागपूर हिंसाचाराच्या घटनेत जमावाने क्रेन, दोन जेसीबी आणि काही चारचाकी गाड्यांची जाळपोळ केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि.18) विधानसभेत दिली. या घटनेत 33 पोलीस जखमी झाले असून, त्यामध्ये डीसीपी स्तरावरील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील एका अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
5 नागरिक जखमी
याशिवाय, या हिंसाचारात 5 नागरिक जखमी झाले. त्यापैकी तिघांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले, तर उर्वरित दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले असून, तहसील पोलीस ठाण्यात दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना केल्या असून, अधिक तपास सुरू आहे.