नागपूर, 18 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) नागपूर शहरातील महाल परिसरात उसळलेल्या तणावानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत, कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला. या व्हिडिओत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर घटनेबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली.
https://x.com/ANI/status/1901686443598323840?t=yfNLNF3T6sTZErJvGIWzFw&s=19
मुख्यमंत्र्यांनी काय म्हटले?
नागपूरच्या महाल भागात काही समाजकंटकांनी अचानक दगडफेक केली आणि पोलिसांवरही हल्ला केला, त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “अशा प्रकारे नागपुरात शांतता भंग करण्याचा प्रयत्न होणे अत्यंत निंदनीय आहे. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. पोलिसांवर हल्ला करणे हा गंभीर गुन्हा आहे, आणि अशा कृत्यांना कदापि माफी नाही.”
दोषींवर कठोर कारवाई केली जाईल: मुख्यमंत्री
ते पुढे म्हणाले, “मी स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागपूर पोलीस आयुक्तांना कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. जर कोणी दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असेल, पोलिसांवर हल्ला करत असेल किंवा समाजात तणाव निर्माण करत असेल, तर त्यांच्यावर कुठलीही दयामाया न दाखवता अत्यंत कठोर कारवाई केली जाईल.”
मुख्यमंत्र्यांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचे आवाहन करताना सांगितले, “शहराची शांतता आणि सुव्यवस्था बिघडू देता कामा नये. जर कोणी जाणूनबुजून वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत असेल, तर प्रशासन त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. नागपूरच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते सर्व उपाय केले जातील.”
नागपूर हिंसाचार प्रकरण
दरम्यान, नागपूरच्या महाल भागात सोमवारी (दि.17) रात्री साडेआठच्या सुमारास काही समाजकंटकांनी अचानक दगडफेक केली आणि त्यांनी पोलिसांवरही हल्ला केला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. सध्या याठिकाणी तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी नागपूरच्या काही भागांत संचारबंदी लागू केली आहे. तर या घटनेनंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना साथ देऊ नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.