नागपूर, 18 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस ठाणे हद्दीत सोमवारी (17 मार्च) दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाल्याने हिंसाचाराची घटना घडली. त्यावेळी शेकडो लोकांच्या जमावाने याठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ केली. यामध्ये काही पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान देखील जखमी झाले. या पार्श्वभूमीवर, नागपूर शहर पोलिसांनी नागपूर शहराच्या काही भागांत संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. याची माहिती नागपूर पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
https://x.com/ANI/status/1901771426950213947?t=O4DUol6F1nCj4cj2r5Tg1Q&s=19
याठिकाणी संचारबंदी लागू
या हिंसाचाराच्या घटनेमुळे नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस हद्दीतील कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर या भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, ही संचारबंदी पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील, असे नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी त्यांच्या आदेशात नमूद केले आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
काय आहे घटना?
नागपूर शहरातील महाल परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सोमवारी (दि.18) सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. या आंदोलनात 200 ते 250 कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘औरंगजेबाची कबर हटाव’ अशा घोषणा दिल्या. तसेच त्यांनी यावेळी औरंगजेबाच्या फोटोची आणि गवताचा पेंडा भरून तयार केलेल्या प्रतिकृतीची कबर जाळली.
या आंदोलनानंतर यानंतर रात्री 7:30 वाजता गणेशपेठ पोलीस ठाणे हद्दीतील भालदारपुरा परिसरात दुसऱ्या समाजातील सुमारे 80 ते 100 लोकांनी जमाव करून पोलिसांवर दगडफेक केली. तसेच त्यांनी यावेळी गाड्यांची जाळपोळ केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊन सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण झाली.
पोलीस आयुक्तांचे आदेश
सदर परिस्थिती लक्षात घेता, नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163(1)(2)(3) नुसार नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस हद्दीतील कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर या भागांमध्ये पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा आदेश दिला आहे.
संचारबंदीचे नियम:
त्यानुसार, या कालावधीत पाच किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. सोबतच कोणत्याही व्यक्तीने अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. यावेळी नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत आणि त्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. तसेच सामाजिक सलोख्याला बाधा आणणाऱ्या कृतीस सक्त मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांनी या आदेशात म्हटले आहे.