पुणे, 16 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील देहू येथे आज (दि.16) जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 375 वा बीज सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिला जगदगुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार श्री क्षेत्र देहू देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदेंनी मंदिर समितीचे आभार मानले. तसेच त्यांनी संतश्रेष्ठ जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेतले.
https://x.com/mieknathshinde/status/1901208823064601059?t=KtdOdkxPpAQGS2XmMiRSpQ&s=19
उपमुख्यमंत्री शिंदेंनी काय म्हटले?
हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून समस्त वारकरी, धारकरी, कष्टकरी, शेतकरी आणि लाडक्या बहिण भावंडांचा असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. संत तुकाराम महाराजांनी 375 वर्षांपूर्वी लिहिलेल्या गाथांमधील तत्वज्ञान आजही कालातीत आहे. 400 वर्षांपूर्वी तुकोबारायांनी हे तत्त्वज्ञान सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत लिहून ठेवले, खरे तर मराठी भाषेचा अभिजातपणा सिद्ध करण्याचा हा सर्वात मोठा पुरावा असल्याचे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदेंनी वारकऱ्यांशी साधला संवाद
तसेच यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित वारकऱ्यांशी संवाद साधला. सोबतच त्यांनी तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली त्या भंडारा डोंगरावरील प्रस्तावित मंदिराच्या कामाची पाहणी केली. या मंदिराचे काम उत्तमप्रकारे सुरू असून ते कधीही थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी दिली. तसेच या कामासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य नक्कीच करू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
लाखो भाविक देहुनगरीत दाखल
दरम्यान, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 375 व्या बीज सोहळ्यानिमित आज राज्यभरातून लाखो भाविक आज देहुनगरीत दाखल झाले आहेत. संत तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी टाळ-मृदंग आणि विठुनामाच्या गजराने येथील वातावरण भक्तिमय असे झाले. तसेच इंद्रायणी नदीच्या काठावर देखील मोठ्या संख्येने भाविक आल्याचे पाहायला मिळाले. या सोहळ्याला वारकऱ्यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.