मुंबई, 16 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने संदीप जोशी, संजय केणेकर आणि दादाराव केचे या आपल्या तीन उमेदवारांना दिली आहे. तसेच, महायुतीच्या सहमतीनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना प्रत्येकी एक जागा सोडण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीकडून एकूण 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
https://x.com/ANI/status/1901130489995694090?t=E_aBwc2AFU69zG2K3elvnQ&s=19
27 तारखेला मतदान
निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार, विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी, दि. 27 मार्च 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मतमोजणी होईल आणि विजयी उमेदवारांची घोषणा केली जाईल. या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना सोमवार, दि. 17 मार्च 2025 पर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येणार आहे. अर्जांची छाननी मंगळवार, दि. 18 मार्च 2025 रोजी करण्यात येईल. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत गुरूवार, दि. 20 मार्च 2025 पर्यंत असणार आहे.
या जागा रिक्त झाल्याने निवडणूक
ही निवडणूक विधान परिषदेतील पाच रिक्त जागांसाठी होत आहे. भाजपचे आमदार आमश्या पाडवी, प्रविण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधानसभेवर निवडून गेल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. या रिक्त जागा भरण्यासाठी आता विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे.
राजकीय हालचालींना वेग
विधान परिषदेच्या या निवडणुकीला राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. सत्ताधारी भाजप, शिवसेना-शिंदे गट, आणि राष्ट्रवादी-अजित पवार गट महायुतीच्या उमेदवारांविरोधात विरोधक काय रणनिती आखतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे काय भूमिका घेतात? हे महत्त्वाचे ठरणार आहे. तर येत्या काही दिवसांत महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित होतील. त्यामुळे या निवडणुकी पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग येणार आहे.