चंद्रपूर, 16 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 5 तरूणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्थानिक पोलिसांनी सर्व मृतदेह बाहेर काढले असून अधिक तपास सुरू आहे. मृतांची ओळख पटली असून, जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे आणि तेजस ठाकरे असे या मृत तरूणांचे नावे आहेत. ही घटना शनिवारी (दि.15) सायंकाळच्या सुमारास घडली. याची माहिती पोलिसांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे.
https://x.com/ANI/status/1900939349065367951?t=d4HuuFT6ongZLa6xKLiqxQ&s=19
पोलिसांनी दिली माहिती
हे सर्व जण चिमूर तालुक्यातील साथगाव-कोलारी येथील रहिवासी होते. शनिवारी हे पाच मित्र घोडाझरी तलावात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, ते या तलावाच्या पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शोधकार्य राबवत काही वेळातच सर्व मृतदेह बाहेर काढले. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.
पुणे, ठाण्यातही घडल्या होत्या घटना
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाने या तलावाच्या सुरक्षिततेबाबत अधिक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. तर याच्याआधी शुक्रवारी (दि.14) पुणे जिल्ह्यातील किण्हई गावाजवळील इंद्रायणी नदीत तीन तरूणांचा बुडून मृत्यू झाला होता. तर गुरूवारी (दि.13) ठाण्यातील उल्हास नदीत रंग खेळल्यानंतर अंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला होता.
अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज
त्यामुळे होळीच्या पार्श्वभूमीवर पाण्यात बुडून मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. होळी आणि धुलिवंदन सणादरम्यान अनेक तरूण तलाव, नदी, विहिरी किंवा जलाशयामध्ये पोहण्यासाठी जातात. मात्र, जलाशयांची खोली, पाण्याचा प्रवाह आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे दरवर्षी अनेक जण बुडून मृत्युमुखी पडतात. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.