पुणे, 14 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील किण्हई गावाजवळील इंद्रायणी नदीत तीन तरूणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.14) सायंकाळच्या सुमारास घडली. गौतम कांबळे, राजदिलीप आचमे आणि आकाश विठ्ठल गोडे अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही पुण्यातील गुरुकुल चिखली परिसरातील रहिवासी होते. या संदर्भातील माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
https://x.com/ANI/status/1900624657507930130?t=XfblHFKkviWrx-ftUtCEaQ&s=19
पोलिसांनी दिली माहिती
पिंपरी चिंचवड परिसरातील देहू रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले की, चार ते पाच मुले किन्हाई गावातील इंद्रायणी नदीत पोहायला आली होती, त्यापैकी तीन मुले बुडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल आणि स्थानिक रहिवासी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बचाव पथकाने शोधमोहीम राबवून संध्याकाळी 6 वाजता या तिघा तरूणांना दीतून बाहेर काढले. त्यांना तातडीने यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनसोडे यांनी दिली.
ठाण्यातही बुडून चार मुलांचा मृत्यू
दरम्यान, या घटनेपूर्वीच गुरूवारी (दि.13) ठाण्यातील उल्हास नदीत रंग खेळल्यानंतर अंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. आर्यन मेदार, आर्यन सिंग, सिद्धार्थ सिंग आणि ओम सिंग तोमर अशी या मुलांची नावे आहेत. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.