ज्यादा व्याजाच्या अमिषाला बळी पडू नका – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई, 13 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील नागरिकांनी भरघोस परताव्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या योजनांच्या जाळ्यात अडकू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केले. आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून टोरेस घोटाळा प्रकरण चर्चेत आले आहे. यासंदर्भातील प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत उत्तर दिले.

https://x.com/shindespeaks/status/1899723094790705660?t=qkNIdSkSd7VQyJ306CUo8Q&s=19

https://x.com/CMOMaharashtra/status/1899889383668670792?t=7nHl1GEyKZFTbK-XCTrB-g&s=19

मुख्यमंत्री काय म्हणाले?

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “साधारणतः जादा व्याज देणाऱ्या 99 टक्के योजना या फसव्या असतात. कोणीही बँकांपेक्षा ज्यादा व्याजदर देऊ शकत नाही. बँकांच्या व्याजदरापेक्षा दोन ते चार टक्के अधिक व्याज दिले जाऊ शकते, मात्र त्यापेक्षा जास्त व्याजाचे आमिष दाखवणाऱ्या योजना या संशयास्पद असतात. नागरिकांनी अशा फसव्या योजनांमध्ये गुंतवणूक करू नये. त्यांनी यासंदर्भात काळजी घ्यावी आणि फसवणुकीच्या जाळ्यात अडकू नये.”

टोरेस घोटाळा प्रकरण

दरम्यान, गेल्या काही महिन्यांत राज्यभरात अनेक ठिकाणी आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच मुंबईतील टोरेस घोटाळा प्रकरण सध्या गाजत आहे. या टोरेस ज्वेलर्सने ग्राहकांना भरघोस परताव्याचे आमिष दाखवून लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. त्यामुळे अनेक लोक संकटात सापडले आहेत.

घोटाळ्याचा तपास सुरू

या घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून, अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. याप्रकरणात काही प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली असून, अद्याप काही जण फरार आहेत. तसेच, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची चौकशी करत आहे. याप्रकरणी आतापर्यंत करोडो रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *