दुबई, 09 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (दि.09) न्यूझीलंडवर 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. या सामन्यात भारतीय संघाने 252 धावांचे लक्ष्य 49 षटकांत पूर्ण करत ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयासह भारताने तिसऱ्यांदा 2002, 2013 आणि 2025 मध्ये ही प्रतिष्ठित ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. विशेष म्हणजे 2002 मध्ये भारताने श्रीलंकेसोबत संयुक्त विजेता म्हणून ही ट्रॉफी जिंकली होती. यासोबतच भारत ही स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणारा संघ बनला आहे.
https://x.com/BCCI/status/1898785831726485880?t=w0ptg8o21fTkHubF28k2hg&s=19
भारतीय गोलंदाजांची प्रभावी कामगिरी
दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 251 धावा केल्या. यामध्ये न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलने 63 आणि मायकेल ब्रेसवेलने 53 धावा करत संघाला लढतीत टिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय गोलंदाजांनी प्रभावी प्रदर्शन करत न्यूझीलंडला 251 धावांवर रोखले. भारताकडून वरूण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली. तर मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
रोहित शर्माची कर्णधाराला साजेशी खेळी
त्यानंतर या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी केली. त्यावेळी शुभमन गिल 31 धावा करून बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीही 1 धावा काढून पायचीत झाला. या सामन्यात रोहित शर्माने 76 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे त्याला अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळाला. तर श्रेयस अय्यरने 48, अक्षर पटेलने 29 आणि केएल राहुलने नाबाद 34 धावा करत विजयात मोठा वाटा उचलला. हार्दिक पांड्यानेही 18 चेंडूत 18 धावा करत महत्त्वपूर्ण योगदान दिले. अखेरच्या क्षणी केएल राहुल आणि रवींद्र जडेजाने संयमी फलंदाजी करत भारताचा विजय निश्चित केला. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर आणि मायकेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. रचिन रवींद्र आणि काइल जेमिसन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशभरात आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे.