पुणे, 09 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल विकाराची प्रकरणे वाढत असून, आतापर्यंत 225 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 197 प्रकरणे निश्चित झाली असून 28 प्रकरणे संशयित आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने शनिवारी (दि.08) माहितीनुसार, या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 6 मृत्यू जीबीएसमुळे झाल्याचे निश्चित झाले असून उर्वरित 6 जणांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.
https://x.com/ANI/status/1898406979397403118?t=84dgxfZRN7xmoPA1_ESBYw&s=19
रुग्णांची आकडेवारी
आतापर्यंत 179 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, 24 जण अद्याप अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. यातील 15 जणांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. ही प्रकरणे प्रामुख्याने पुणे महानगरपालिका, नव्याने समाविष्ट झालेली गावे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे ग्रामीण आणि इतर जिल्ह्यांमध्ये आढळली आहेत. यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रात जीबीएसचे 46 रुग्ण, पुणे महानगरपालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट गावांमध्ये 95, पिंपरी-चिंचवड महापालिका 33, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 37 आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये 14 रुग्ण आढळले आहेत.
पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले
या पार्श्वभूमीवर, पुणे महानगरपालिका आणि पुणे ग्रामीणमधील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शहराच्या वेगवेगळ्या भागातून 7,262 पाण्याचे नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठवले आहेत. आतापर्यंत 144 नमुन्यांचे पाणी दूषित असल्याचे आढळले आहे, त्यामुळे आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
घरांचे सर्वेक्षण
तसेच या परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे काम वाढवण्यासाठी, पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 89,699 घरांची पाहणी झाली. पुणे महानगरपालिकेत 46,534, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 29,209 आणि पुणे ग्रामीण भागात 13,956 घरांचा समावेश आहे.
अन्न चांगले शिजवून खावे
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांना गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे ओळखण्याचे आणि त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच पिण्याचे पाणी उकळून प्यावे, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करावे असा सल्लाही देण्यात आला आहे. नागरिकांनी शिळे किंवा अर्धवट शिजवलेले अन्न, अर्धवट शिजवलेले विशेषतः चिकन आणि मटण खाण्याचे टाळावे, असे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे.
नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पाण्याचे नमुने खासगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवू नयेत, अशी विनंती देखील आरोग्य विभागाने केली आहे. त्याऐवजी अधिकृत माहिती किंवा पाणी परीक्षणाबाबत मार्गदर्शनासाठी पुणे महानगरपालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.