धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांनी केला मंजूर

धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा मंजूर

मुंबई, 04 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज (दि.04) आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा राज्यपालांनी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीनुसार राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी राजीनामा स्वीकारल्याची माहिती दिली आहे.

https://x.com/maha_governor/status/1896899175411073246?t=X3i6NTHGhQYErT3Ck9eWNA&s=19

https://x.com/dhananjay_munde/status/1896801145974296846?t=qPqul0jNjJLTjlXPVu4tvw&s=19

सोशल मीडियावरून दिली माहिती

धनंजय मुंडे यांनी राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी लिहिले, “बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, त्याची न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सद्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

राजीनाम्याची मागणी होती

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे मन सुन्न करणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंडे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारून मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवला होता. त्यानंतर त्यांचा राजीनामा आता मंजूर झाला आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. यासंदर्भात विरोधी पक्ष तसेच विविध सामाजिक संघटना यांच्याकडून अनेक आंदोलने करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *