भिगवण, 04 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे गावच्या हद्दीत दोन अनोळखी व्यक्ती दुचाकीवर संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यांना चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतले. भिगवण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याची माहिती भिगवण पोलीस अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना 1 मार्च 2025 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती दुचाकीवर शेटफळगढे गावच्या हद्दीत संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती भिगवण पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन या दोन्ही व्यक्तींची चौकशी केली असता, त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक तपास केल्यावर त्यांची नावे विशाल पवार (वय 36, रा. लासुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे) आणि प्रज्वल मुडपणे (वय 22, रा. पिटकेश्वर, ता. इंदापूर, जि. पुणे) असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल
पोलिसांनी त्यांची कसून तपासणी केली असता, त्यांच्यावर यापूर्वी, इंदापूर आणि वालचंदनगर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ते दोघे चोरी करण्याच्या उद्देशाने तसेच जनतेचे व मालमत्तेचे नुकसान करण्याच्या हेतूने फिरत असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी या दोघा आरोपींना अटक केली. याप्रकरणी भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी या दोघांविरुद्ध भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम 128 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
येरवडा कारागृहात रवानगी
त्यानंतर या दोघा आरोपींना त्यांना 3 मार्च 2025 रोजी बारामती विभागाचे विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या समोर हजर करण्यात आले. त्यावेळी आरोपी जामीनाची आवश्यक ती कागदपत्रे वेळेवर सादर करू न शकल्यामुळे, त्यांना पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे भिगवण पोलिसांनी सांगितले आहे. त्यानुसार, त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी
ही संपूर्ण कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण जर्दे, पोलीस अंमलदार प्रमोद गलांडे, पांडुरंग गोरवे, शैलेश हंडाळ, आप्पा भांडवलकर आणि दक्ष नागरिक सागर संजय वाबळे, प्रमोद वसंत गलांडे यांनी पार पाडली.