दिल्ली, 04 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विशेष घोषणा केली आहे. त्यानुसार, 8 मार्च रोजी काही निवडक महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल सोशल मीडिया अकाऊंट्स हाताळण्याची संधी मिळणार आहे. यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी महिलांना ‘नमो अॅप ओपन फोरम’वर त्यांच्या जीवन प्रवासाबाबत लिहिण्याचे आवाहन केले. या प्लॅटफॉर्मवर अनेक प्रेरणादायी कथा येत आहेत आणि त्यातूनच काही महिलांची निवड करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
https://x.com/narendramodi/status/1896560412063400406?t=bEVFMdwv294l0GCCh6jGKg&s=19
पंतप्रधान मोदींची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वरील एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मी नमो अॅप ओपन फोरमवर आलेले अनेक प्रेरणादायी जीवनकथा पाहत आहे. 8 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून त्यातील काही महिलांना माझे सोशल मीडिया अकाउंट्स हाताळण्याची संधी मिळेल. मी अधिकाधिक महिलांना त्यांचे अनुभव शेअर करण्याचे आवाहन करतो.”
दरम्यान, महिला दिनानिमित्त पंतप्रधानांनी घेतलेला हा निर्णय महिलांच्या सशक्तिकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा निर्णय महिलांना अधिक आत्मविश्वास देणारा आहे. तसेच पंतप्रधानांचे विविध सोशल मीडिया अकाऊंट्स हाताळण्याची संधी मिळाली तर महिलांना एक नवीन अनुभव मिळणार आहे. त्यामुळे महिलांसाठी ही एक मोठी संधी असल्याचे म्हणावे लागेल.
पीएम मोदींचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असतात. पंतप्रधान मोदींचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर सध्या 105 मिलियन फॉलोवर्स आहेत. इंस्टाग्रामवर त्यांचे 92.3 मिलियन फॉलोवर्स आहेत. पंतप्रधानांचे फेसबूकवर 50 मिलियन फॉलोवर्स आहेत. तसेच यूट्यूबवर त्यांचे 2.71 सबस्क्रायबर आहेत.