मुंबई, 03 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (दि.03) सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत 6,486.20 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या 6,486.20 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांमध्ये 932.54 कोटी रुपयांचा अनिवार्य मागण्या, 3,420.41 कोटी रुपयांच्या विविध कार्यक्रमांतर्गत मागण्या, तर 2,133.25 कोटी रुपयांच्या मागण्या केंद्र पुरस्कृत योजनांअंतर्गत अर्थसहाय्य म्हणून प्रस्तावित आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. तर उद्या आणि परवा या पुरवणी मागण्यांवर विधानसभेत सविस्तर चर्चा होणार आहे.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1896486574491087131?t=4CM-nZ7yYpSw4Zpg5gr9ew&s=19
महत्त्वाच्या योजनांसाठी निधी
या मागण्यांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांसाठी घरे, मुख्यमंत्री बळीराजा वीजदरसवलत योजनेंतर्गत कृषी पंपधारकांना वीज सवलत, तसेच केंद्र सरकारच्या योजनांद्वारे रस्ते आणि पूल प्रकल्पांसाठी बिनव्याजी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना, पुणे रिंग रोड, जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासाठी बळीराजा जलसंजीवनी योजना यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना या पुरवणी मागण्यांमधून वित्तीय मदत दिली जाणार आहे.
अर्थमंत्र्यांचा विश्वास
अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, राज्याच्या पायाभूत विकासाला बळकटी देण्यासाठी या अनुषंगाने यंदा एकूण 6,486.20 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. या मागण्यांपैकी निव्वळ भार 4,245.94 कोटी रुपये इतका आहे. या निधीतून राज्याच्या पायाभूत सुविधांना चालना मिळेल. तसेच राज्यातील विविध घटकांचा सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.