जळगाव, 03 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) केंद्रीय युवा आणि क्रीडा राज्यमंत्री तथा भाजप नेत्या रक्षा खडसे यांच्या मुलीची आणि तिच्या मैत्रिणींची छेडछाड केल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील एका आरोपीवर याआधीही चार गुन्हे दाखल असल्याची माहिती मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी दिली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
https://x.com/ANI/status/1896210630572659036?t=oK1YPErxMjdVe7WgCzktHw&s=19
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 28 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील महाशिवरात्री यात्रेदरम्यान घडली. त्यावेळी या यात्रेत काही जणांनी रक्षा खडसे यांच्या मुलीची आणि तिच्या मैत्रिणींची पाठलाग करून छेडछाड केली. याप्रकरणी अनिकेत भुई, पीयूष मोरे, सोहम कोडी, अनुज पाटील, चेतन भुई, सचिन पालवे आणि किरण मडी या 7 आरोपींच्या विरोधात पॉक्सो ॲक्ट आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी पिंगळे म्हणाले की, “सात आरोपींवर गुन्हा दाखल असून, त्यापैकी अनिकेत भुई याच्यावर याआधी चार गुन्हे नोंद आहेत. पोलिसांनी एकाला अटक केली असून, उर्वरित आरोपींच्या शोधासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत.”
रक्षा खडसे यांची पोलिसांत तक्रार
या घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेत्या रक्षा खडसे यांनी जळगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली. “माझी मुलगी आणि तिच्या मैत्रिणी यात्रेला गेल्या असताना काही लोकांनी त्यांची छेड काढली. एवढेच नाही, तर सेक्युरिटी गार्डच्या उपस्थितीतच आरोपींनी मुलींचे व्हिडिओदेखील शूट केले. ही घटना अत्यंत निंदनीय आहे, त्यामुळेच मी तक्रार दाखल केली,” असे खडसे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
या घटनेवर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. “ही घटना अत्यंत लाजिरवाणी आहे. काही राजकीय पक्षांशी संबंधित लोकांनी हा प्रकार केला आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचा छळ माफ केला जाणार नाही. पोलिसांनी तातडीने कारवाई केली असून, आणखी कठोर पावले उचलली जातील,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.